सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादी येत्या दोन दिवसांत नव्या उमेदवाराची घोषणा करेल, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, सुनील माने, सत्यजीत पाटणकर आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावांवर चर्चा झाली असून यातील एकाचे नाव जाहीर केले जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार? कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत? महाविकास आघाडीचे जागावाटप अशा विविध मुद्द्यांवर शरद पवार यांना पत्रकारांनी बोलते केले. उदयनराजेंच्या प्रश्नावर तर खळखळून हसत शरद पवार यांनी ‘कॉलर’ उडवली आणि ‘है तयार हम’ असा इशाराच दिला. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून निवडणूक लढवतील, या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या.
लवकरच नाव जाहीर करणार
सातारा आणि सातारा जिल्ह्याशी दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा संबंध राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा महत्त्वाचा जिल्हा आहे. इथला कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे. इथे कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांची संसदेतील कामगिरी चांगली होती. त्यांनी प्रामाणिकपणे विकासाची कामे केली. त्यांनी पुन्हा निवडणूक लढावी, असे सर्वांचे म्हणणे होते. पण आरोग्याचा प्रश्न असल्याने त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील उमेदवाराचे नाव जाहीर करू, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.