जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
काही लोक निव्वळ स्वतःच्या भाकरी भाजण्यासाठी राजकारण करतात आणि व्यक्तींना जाती-धर्मांच्या आणि सत्तेच्या आधारावर वाटून टाकतात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मात्र सामान्य जनतेमध्ये आपापसात जे प्रेम आहे त्या गोष्टीला कुठेही तोड नाही. असे प्रतिपादन भारतातील गणित तज्ञ पद्मश्री डॉक्टर आनंद कुमार यांनी व्यक्त केले.
ते एसडी सीड अर्थात सुरेश दादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेमार्फत उच्च शिक्षणासाठीच्या देण्यात येणाऱ्या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध मुलाखतकार सौ मंगला खाडीलकर यांनी यावेळी डॉक्टर आनंदकुमार यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सर्वांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
गणितातील जगप्रसिद्ध प्राध्यापक, सुपर थर्टीचे जनक, तसेच गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न फुलविणारे व त्यांचे करिअर घडविणारे पद्मश्री आनंदकुमारजी पटना यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, एसडी-सीड अध्यक्षा रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी, जैन उद्योग समूहाचे अशोक भाऊ जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. आनंदकुमार म्हणाले, आम्ही विद्यार्थी निवडतांना त्याच्या बुद्धीपेक्षा त्याच्या उमेदीला महत्व देतो. विद्यार्थी किती शिकला आहे, त्याला किती ज्ञान आहे ही अत्यंत छोटी बाब आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांमध्ये किती उमेद आहे, आपल्या आजूबाजूला असलेल्या कस्टमय जीवनातून त्याची निघण्याची किती तीव्र इच्छा आहे, मेहनत करण्याची त्याची किती लालसा आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही धर्म, राज्य मर्यादा त्यांना रोखत नाही. मेहनत करण्याची लालसा विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो.
दरवर्षाप्रमाणे यंदाही एसडी-सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजने मार्फत उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरणाचा सोहळा मंगळवार दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर, जळगाव येथे पार पडला.