सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रदीर्घ अश्या लढ्याला सरतेशेवटी यश आले असून महाविद्यालयाने कमवा व शिका योजना पुन्हा महाविद्यालय पातळीवर सुरू करण्यात आल्याची नुकतीच घोषणा केली आहे. यामुळे गरीब गरजू या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषेदेच्या सभेत ठराव पास करून क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त महाविद्यालयातील कमवा व शिका योजना व आर्थिक दुर्बल घटक विकास योजना या बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, भटके – विमुक्त व आर्थिक दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक भवितव्यावर दीर्घ परिणाम होणार होता.

विद्यापीठाचा हा ठराव अत्यंत निर्दयी आणि अमानुष होता. कारण या योजना सदर वर्गजाती समूहाला शिक्षण घेण्याच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या होत्या. शिक्षण हे इथल्या कष्टकरी वर्गजातींचे सर्वंकष मुक्तीचे साधन आहे. परिणामी या गंभीर बाबीचा विचार करून सत्यशोधक विद्यार्थी संघटना, जळगावने तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दि. २२ फेब्रुवारी २०२२ ला या संदर्भात निवेदन दिले होते. यानंतर या निवेदनाचा सतत पाठपुरावा चालूच होता.

दरम्यान यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मा. कुलगुरूंना दि. १२ ऑगस्ट २०२२ ला निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंशी सविस्तर चर्चा करून त्यांना या योजनेचे महत्व लक्षात आणू दिले होते. त्यांनतर मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य यांना दि. २२ ऑगस्ट २०२२ ला पुन्हा निवेदन देण्यात आले होते.

त्यावेळी प्राचार्यांनी आमच्या पातळीवर योजना राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि जानेवारी पर्यंत योजना सुरू होईल, असे आश्वासन दिले. या निवेदना नंतरही मा. प्राचार्य आणि विद्यार्थी विकास अधिकारी यांच्याकडे संघटनेन पाठपुरावा सुरूच ठेवला होता.

आता या लढ्यात सत्यशोधक विद्यार्थी संघटना यशस्वी झाली असून कमवा व शिका योजना पुन्हा महाविद्यालय पातळीवर सुरू केली आहे. यामुळे गरजू व पात्र विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे मोठ्या प्रमाणावर आभार मानले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.