सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालयात शिक्षक ऋणनिर्देश सोहळा संपन्न

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती उत्कट आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखा व अविस्मरणीय असा शिक्षक ऋणनिर्देश सोहळा साजरा केला. समारंभासाठी माजी विद्यार्थी प्रवीण फुलपगार, शैलेश झंवर, अजय पाटील, अनुप शिंपी, निलेश अडवाणे, राजू भाट, हेमराज पाटील, दिपक ठाकूर, विजय फुलपगार, अशपाक पटेल, रियाझ देशमुख, विष्णू बिर्हाडे, मुकुंद नन्नवरे, अमोल सोमाणी आणि समस्त वर्गमित्र-मैत्रिणींनी शिक्षक ऋणनिर्देश सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली. कल्याण येथील प्रथमेश पाटील या चिमुकल्याने आपल्या गोड स्वरात स्वागत गीत म्हणून उपस्थित शिक्षकांना मंत्रमुग्ध केले. विलास सपकाळे यांनी विविध गाणे गात उपस्थितांना भारावुन टाकले.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ओरियन शाळेच्या संगीत शिक्षिका वैशाली शिरसाळे, प्रसिद्ध कवी सतीश जैन तसेच पालघर नगरपालिकेचे प्रमुख सल्लागार डॉ. पंकज पवार हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन सुनिल झंवर यांनी भुषविले. शाळेचे माजी विद्यार्थी निलेश अडवाणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि प्रस्तावना सादर केले.

या सोहळ्यास मोठ्या संख्येने शिक्षक वृंद आणि १९९५ बॅचचे माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, बडोदा, सुरत, कोल्हापूर, नाशिक येथुन उपस्थित राहिले. मान्यवर व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्नेहभेट देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षिका माया धुप्पड, बोरोले मॅडम, तोतला मॅडम, मंत्री मॅडम, कल्पना झंवर, व गायत्री राठी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 92 वर्षाचे प्रल्हाद गणेश परदेशी सर हे मेळाव्याचे विशेष आकर्षण होते. बी. एन. सोमाणी, मोतीराय, धनगर सर तसेच प्रा. तुषार चांदवडकर, डॉ. संदीप माळी, सतीश जैन, इम्रान देशमुख, विलास सपकाळे, नीलिमा पाटील, सरिता सोमाणी या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी ताज्या केल्या.

प्रयोगशाळा सहाय्यक महाजन यांनी गीतातून विद्यार्थ्यांवरील प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश झंवर, अनुप शिंपी, रेखा नन्नवरे, योगिता कापुरे व अनिता पाटील यांनी केले. तसेच सुनील झंवर यांनी अध्यक्षीय भाषण केले. आभार प्रदर्शन प्रविण फुलपगार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.