सप्तशृंगीगड दानपेटी प्रकरणी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची दिशा बदलून त्यावर चुना लावत सुरक्षा रक्षकानेच सप्तशृंगीगड येथे भगवती मंदिर परिसरातील दानपेटीतून रोकड काढल्याने त्याच्या विरोधात कळवण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ हिरामण रावते (30) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सीसीटीव्हीत छेडछाड तसेच ठिकाणी दानपेटीत जळालेल्या नोटप्रकरणी ट्रस्टच्या सुरक्षा विभागाने झालेल्या प्रकाराची तक्रार विश्वस्त मंडळ व्यवस्थापनाकडे सादर केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी मंदिर परिसरात प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत नोंदविलेले निष्कर्ष व गोपीनीय केलेली चौकशी प्रक्रियेद्वारे काही बाबी निदर्शनास आल्या.

त्याप्रमाणे सदर ठिकाणी सी.सी.टी.व्ही यंत्रणेचे कॅमेरे हलविले होते, कॅमेराच्या समोर चुना लावलेला होता तसेच जळालेल्या नोटा घटनास्थळी आढळून आल्या. मात्र कोणतीही दानपेटी फोडलेली नव्हती तसेच पेटयांचे सील सलामत होते. 13 फेब्रुवारी 2023 ते 2 मार्च 2023 दरम्यान सीसीटीव्ही फुटेजची केलेल्या तपासणीत मंदिरात महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सोमनाथ रावले या सुरक्षा रक्षकांने दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9.00 वाजेपासून ते दि.13.02.2023 रोजी पहाटे 5 वाजे दरम्यान भगवती मंदिरातून रोपवेकडे बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या दोन विविध दानपेटीतून काठीच्या सहाय्यान नोटा काढण्याचा प्रयत्न केला तसेच काही चलनी नोटा काढण्यास तो यशस्वी झाला. त्यापूर्वी त्याने परिसरातील विविध सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍यावर चुना लावून, त्याची दिशा बदलून सदरची चोरी केली आहे.

सदरचा कर्मचारी हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अखत्यारीतील असल्याने घटनेच्या संबंधित उपलब्ध तपशील हे सुरक्षा महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांकडे सादर करून उचित कारवाई करण्याचे निर्देश देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे सुरक्षा कर्मचार्‍या विरुद्ध आज( दि.4) कळवण पोलीस ठाणे येथे गु.र. क्रं. 63/2023 अन्वये भा. द. वी. 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.