वारकरी संप्रदायातील वारीक संत : संत सेना महाराज

0

लोकशाही विशेष लेख 

 

आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।

विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।

उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।

भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

 

वारकरी संत परंपरेत नाभिक समाजाच्या संत सेना महाराजांचं योगदान अभूतपूर्व असं आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासह वारकरी संत परंपरेला आणि संत साहित्याला नाभिक समाजाचे संत सेना न्हावी यांनी आपल्या भक्तीतून एक अनोखे योगदान दिले आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत सेना महाराजांच्या भक्ति आणि जीवनकार्याचा घेतलेला अल्पसा आढावा..

मध्य प्रदेशतील बांधवगढ़ संस्थानतील इरची या गावी संत सेना महाराजांचा जन्म झाला. सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजांकडे नाभिकाचे काम करत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देवीदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकांचे काम सेना महाराजांचे आले. सेना महाराजांचा लहानपणा पासुन भक्ती मार्गाकडे ओठा होता. त्यांच्या हिंदी मातृ भाषेतुन ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्रातील त्या काळाच्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतुर झाले. तीर्थयात्रा करीत करीत ते इकडे पंढरपुरात आले. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महाजन संतांच्या सानिध्यात येऊन ते महाराष्ट्राच्या पावन भूमीत रममान झाले.

संत सेना महाराजांनी मराठी भाषा आत्मसात करून मराठी भाषेवर इतके प्रभुत्व मिळवले की, मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भज्ञगवंत संप्रदायातील वारकरी भक्ती प्रसाद त्यांनी स्वतःला झोकून दिले. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तीरचना वाचतांना महाराष्ट्रातील भक्तांना जरा सुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज व अन्य संतांप्रमाणे महाराजांनाही श्रेष्ठ मानले जाते ते त्यांच्या संत साहित्यामुळे.

संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जाते. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यांच्या तोंडून वेद म्हणून घेतले. अशा प्रकारच्या अनेक कथा ज्याप्रमाणे संतांच्या बाबतीत सांगितल्या जातात. तशीच कथा संत सेना महाराजांच्या बाबतीतही सांगितले जाते. राजाची हजामत करण्यासाठी राजाचा माणूस सेना न्हावी यांच्याकडे निरोप सांगावयास जातो. परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना न्हावी यांना निरोप ऐकू जात नाही. उशीर झाल्यामुळे राजा क्रोधित होतो, मात्र सेना न्हाव्याला शिक्षा होईल म्हणून स्वतः भगवंत पांडुरंग धोपटी घेऊन राजाची हजामत करून जातात, अशी ही भक्ति फळाला लागली.

नामदेव महाराज, तुकाराम महाराज, सेना न्हावी, गोरा कुंभार, ज्ञानदेव महाराज, चोखामेळा महाराज अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुद्धा ईश्वर भक्ती करून परमार्थ साधला जाऊ शकतो, हे या महान संतांनी सांगितले आहे. उच्च वाणीयांनी निर्माण केलेली उच्चनिच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्वतः ही तसे वागले.

संत सेना महाराजांनी निर्माण केलेले काव्यअभंग यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की त्यांचे मोठेपण सिद्ध करण्याचीही काहीच गरज निर्माण झाली नाही. अशा या महान संतास पुण्यतिथी निमित्ताने कोटी कोटी वंदन…!

जय श्री संत सेना महाराज की जय

– संकलन

गणेश सेठी

अखिल भारतीय जीवासेना जिल्हाअध्यक्ष

खानापूर ता. रावेर

Leave A Reply

Your email address will not be published.