एकनाथ खडसेंनी शरद पवारांना दिला दगा !

महाजनांना शह देण्याचा प्रयत्न : संजय पवार यांची टीका

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करणार असून हा शरद पवार यांच्याशी दगाफटका असून खडसे मंत्री गिरीश महाजन यांनाही शह देण्याच्या तयारीत असल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे. खडसेंनी शरद पवार यांना धोका दिला असून त्यांच्याशी गद्दारी केली आहे. पवार साहेबांच्या जवळच्या लोकांना दूर करीत त्यांनी पंख छाटण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या भिंतीवरील फोटो कधीच काढले नाही. पवार साहेबांना धोका देणारी लोक राजकारणात सक्रिय झाली आहेत अशा शब्दात संजय पवार यांनी खडसेंच्या पक्षांतराचा समाचार घेतला आहे.

भारतीय जनता पक्षात 40 वर्ष राहिलेले ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आपल्या राज्यातील नेतृत्वावर टीका करीत भाजपातून बाहेर पडले. ऑक्टोबर 2020 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 महिन्याच्या कार्यकाळात पक्षाने एकनाथराव खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांना बरेच काही दिले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथराव खडसे विधान परिषदेत आमदार म्हणून देखील निवडून आले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात खडसेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपची वाट धरत असल्याचे सांगितले आहे. एकनाथराव खडसेंच्या घरवापसीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट ढवळून निघणार असून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे भाजपमध्ये खडसेंची घरवापसी म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना शह मानला जात आहे. दुसरीकडे खडसेंनी राष्ट्रवादी सोडणे म्हणजे शरद पवार यांच्याशी गद्दारी म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर चर्चा

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसापूर्वी देखील एकनाथराव खडसेंचा चांगलाच समाचार घेत टीका केली होती. आता खडसेंनी भाजप प्रवेशाबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा संजय पवारांनी त्यांचा समाचार घेतला आहे. संजय पवार यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश पोस्ट करीत आपल्या भावना मांडल्या आहेत. खडसे यांनी आ.मंगेश चव्हाण, ना.गिरीश महाजन यांच्यासोबत शरणागती पत्कारली आणि नंतर पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली असे त्यांनी म्हटले आहे.

शपथ घेवून सांगा !

इतकंच नव्हे तर एकनाथराव खडसेंचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करीत पूजनीय शरदचंद्र पवार साहेबांना धोका देणारी एक अवलाद जन्माला आली असून तिचा नायनाट करा असेही त्यांनी म्हटले आहे. खडसेंनी शरद पवार यांच्याशी जुळून असलेल्या घराण्यांना दूर करण्याचे काम करीत त्यांचे हात तोडले. रोहिणी खडसे या शरद पवारांच्या सोबत असल्याचे सांगत असल्या तरी त्यांनी संत मुक्ताईच्या मंदिरात शपथ घ्यावी, असे संजय पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.