‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’, असा संदेश देणारे साने गुरुजी यांची अंमळनेर ही कर्मभूमी. साने गुरुजींच्या कर्मभूमीत ते हयात नसताना दोन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. आता फेब्रुवारी 2, 3 आणि 4 तारखेला 97 वे साहित्य संमेलन पार पडले. त्याआधी 72 वर्षांपूर्वी म्हणजे 1952 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. साने गुरुजी या महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर नगरीत साने गुरुजींचे एक स्मारक व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती.
त्यानुसार पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “अमळनेर येथे साने गुरुजींचे भव्य स्मारक उभारण्यात येईल आणि त्याला लवकरात लवकर मूर्त स्वरूप येईल,” अशी घोषणा केली. स्वतः उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते आहे. तथापि सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
त्यात ‘साने गुरुजींच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केली नाही’, हे येथे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांमध्ये साने गुरुजींचे नाव अग्रभागी होते. तसेच मराठी साहित्यात त्यांनी विपुल असे साहित्य निर्माण केलेले आहे. त्यांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे. त्यांच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीच्या आजपर्यंत अनेक आवृत्या निघाल्या आहेत आणि यापुढेही निघतील. कारण ‘श्यामची आई’ हा साहित्यातील ठेवा कधीही कालबाह्य होऊ शकणार नाही. आजच्या तरुण पिढीला साने गुरुजींची प्रेरणा घेण्यासाठी त्यांचे स्मारक हे नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
परंतु आपले ‘महाराष्ट्र सरकार थोर विभूतींच्या स्मारकाबाबत संवेदनशील नाही’. बालकवी ठोंबरे धरणगावचे. धरणगावला त्यांचे स्मारक व्हावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ज्या भादली रेल्वे स्टेशनवर रेल्वे खाली त्यांचा विचित्र मृत्यू झाला, त्या मृत्यूस्थळावर कसेबसे स्मृतिस्थळ उभारले आहे. निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या आसोदा गावी गेल्या पंधरा वर्षांपूर्वी बहिणाबाईंचे स्मारक करण्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी करून प्रथम पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु ते पाच कोटी खर्च करून जे काही इमारतीचे सांगाडे उभे करण्यात आले,
त्यानंतर पंधरा वर्षात त्याच्याकडे कोणी लक्षही दिले नाही. तिथे घाणीचे साम्राज्य पसरले होते. आता कुठे पर्यटन विभागामार्फत पर्यटन मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी दहा कोटी रुपये मंजूर केले. पर्यटन विभागातर्फे त्याची निविदा सुद्धा निघाली आहे. बहिणाबाई चौधरी यांचे आणखी चांगले स्मारक बनवण्यासाठी अधिक प्रयत्न झले पाहिजेत. ते एक साहित्यिक कवी आदींचे प्रेरणास्थान बनले पाहिजे. तसेच ते एक पर्यटन केंद्र ही बनले पाहिजे. कारण मराठी बाराखडीची अक्षर ओळख नसलेल्या निरक्षर बहिणाबाईने रचलेल्या कवितेन मधून जे तत्त्वज्ञान सांगितले आहे,
त्याला तोड नाही. म्हणून बहिणाबाईंचे तिच्या माहेरी असोदा येथे होणारे स्मारक आता त्वरेने उभारले जावे. बहिणाबाई चौधरींच्या स्मारकासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीला या स्मारकाबाबत पाठपुरावा करता करता त्यांची जी दमछाक झाली, त्याची कहाणी वेदनादायी आहे. वेळप्रसंगी त्यावर स्वतंत्र प्रकाश ज्योत टाकण्यात येईल. परंतु जळगाव पासून जवळच असलेल्या आसोदा येथे बहिणाबाईंचे स्मारक साहित्यिकांचे पर्यटकांचे एक केंद्र बनू शकते. आता आसोदा येथे जाण्यासाठी तापी नदीवर बनवलेला पूल आणि मध्य रेल्वेचा उड्डाण पूल झाल्याने ते अधिक सोयीचे झाले आहे.
अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनंतर सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्याने सर्वांच्या आशेवर पाणी फिरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साने गुरुजींच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर याच स्तंभात दैनिक लोकशाहीतर्फे कौतुक केले होते. सोबतच ‘स्मारकाची ही घोषणा फक्त सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा ठरता कामा नये’, असा इशाराही देण्यात आला होता. नेमकी स्मारकाची घोषणा झाली. मात्र त्याला मूर्त स्वरूप कधी मिळणार आहे? की ते मिळणारच नाही? हा प्रश्न जळगावकरांच्या मनात उपस्थित होतो आहे. राजकारणाच्या साठमारीत अर्थसंकल्पात अनावधानाने निधीची तरतूद होऊ शकली नसेल, तर त्याबाबत वेगळा निधी उपलब्ध करून त्यास स्मारकाचे काम होईल असे करावे. असे साने गुरुजी प्रेमींच्या वतीने तसेच जळगाव जिल्हा वासियांच्या वतीने नम्र आव्हान करण्यात येत आहे…!