साने गुरुजी साहित्य नगरी संमेलनासाठी सजतेय

0

लोकशाही संपादकीय लेख

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येत्या दोन, तीन व चार फेब्रुवारीला पूज्य साने गुरुजी कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे सुरुवात होत आहे. ७० वर्षांपूर्वी अंमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय संमेलनाच्या वेळी सुद्धा साने गुरुजी हयात नव्हते आणि आता २०२४ साली होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कै. साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर नगरीत होत असलेल्या या संमेलनामुळे संपूर्ण खानदेशात उत्साहाचे वातावरण होणे साहजिक आहे. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजींची अंमळनेर ही कर्मभूमी. ज्या प्रताप महाविद्यालयात साने गुरुजींचे वास्तव्य होते, त्याच प्रताप महाविद्यालय परिसरात हे साहित्य संमेलन होत आहे, हे विशेष होय. या परिसराला ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्याला सुरुवात झाली आहे. त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. संमेलनासाठी येथे तीन भव्य सभा मंडप उभारले जात आहेत. पहिले सभागृह ‘खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह’ असेल दुसरे सभागृह ‘बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह’ तर तिसरे सभागृह कवी ‘ना. धो. महानोर सभागृह’ नावाने उभारले जात आहे. हे तीनही कवी जळगाव जिल्ह्यातील मातीतले असल्याने खानदेशवासीयांची मान स्वाभिमानाने उंचावणार आहे. साने गुरुजी साहित्य नगरीत या तीनही सभागृहांबरोबरच भव्य मुख्य व्यासपीठ ग्रंथ प्रदर्शनासाठी भव्य दालन उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन, तीन आणि चार फेब्रुवारीला होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी सभापती ‘सुमित्रा महाजन’ यांचे हस्ते होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती राहील. तीन दिवसीय संमेलनाच्या समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारोप होणार आहे. साहित्य संमेलनाच्या मेजवानीचा लाभ खानदेशवासीयांना घेता येणार आहे, हे विशेष होय..

संमेलनाचे स्वागताध्यक्ष ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन संरक्षण आणि सल्लागार पालकमंत्री गुलाबराव पाटील तर संमेलनाचे निमंत्रक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे वेळोवेळी संमेलनाच्या आयोजनाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनात अमळनेरचे विभागाचे प्रांताधिकारी महादेव खेडकर शासनातर्फे समन्वयकीची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे बांधकाम खाते पोलीस प्रशासन आणि अमळनेर नगरपालिकेच्या वतीने विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या जात आहेत. अंमळनेर विशेषतः साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणारे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्व अर्थाने लक्ष वेधून घेणारे एक आगळे वेगळे संमेलन करावे, असा प्रयत्न केला जात आहे. अमळनेर येथे साने गुरुजी साहित्य नगरीत होणाऱ्या प्रताप महाविद्यालयाच्या मैदानाचे पूर्ण सपाटीकरण करून रस्ते बनवले जात आहेत. संमेलन स्थळी साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे. साने गुरुजी साहित्य नगरी सजते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या साहित्यिकांना खानदेशी मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. खानदेशी भरीताचा आस्वाद साहित्यिकांना घेता येणार आहे. खानदेशी भरीत बनवण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. या साहित्य संमेलनाचा लाभ खानदेशातील साहित्यिकांना मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे. तीन दिवस अमळनेर शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होईल. या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन, परिसंवाद याबरोबरच दररोज गजलांचा कार्यक्रम होणार आहे. विविध साहित्यिकांच्या ग्रंथासाठी स्वतंत्र ग्रंथ दालन उभारले जाणार असल्याने ग्रंथ दालन हे संमेलनाचे खास वैशिष्ट्य राहणार आहेत. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून साने गुरुजी साहित्य नगरी सजते आहे. आता पंधरा दिवसांवर हे साहित्य संमेलन येऊन ठेपल्याने उत्सुकता वाढली आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.