वाळू माफियांच्या विरुद्ध जनतेकडूनही उठाव हवा

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची गुंडगिरी हाणून पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात महसूल खात्यातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सुरू केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. गेले महिना दोन महिन्याच्या कालावधीत वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी गिरणा, तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करताना धाडी टाकून त्यांची वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. वाळू माफियांना दंड ठोठावण्यात येत आहे. वाळू माफियांनी केलेल्या अवैध वाळूच्या साठ्यांवर धाडी टाकून वाळूचे साठे जप्त करण्यात येत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात येत आहेत. एवढ्यावरच न थांबता वाळू माफियांना वठणीवर आणण्यासाठी सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर वाळूमाफियांविरुद्ध मोक्का लावून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची प्रक्रिया पोलीस विभागाच्या सहकार्यांतर्फे सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

पाण्यातील माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा मासा तडफडतो, तशी तडफड अवैध वाळू उपसाला करणाऱ्यांची महसूल खात्यातर्फे प्रतिबंध केल्यानंतर होत आहे. अवैध वाळूतून मिळणाऱ्या पैशाची आवक बंद झाल्यानंतर वाळू माफियांतर्फे महसुलाच्या प्रांताधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला गेल्याची निषेधार्ह संतापजनक घटना शनिवारी वाळू माफियांनी केली. वाळू माफियांच्या गुंडगिरीचा हा उच्चांक म्हणता येईल. महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जीवावर उदार होऊन कारवाई करण्याचे धाडस करण्यात येत आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे अवैध वाळू उपसावर धाड टाकणारे महसूल खात्याचे एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना खाली पडून त्यांचा गळा आवळून जिवंत मारण्याचा भ्याड प्रयत्न केला. गायकवाड यांचे नेतृत्वात कारवाई करणाऱ्या मंडळ अधिकारींसह पाच-सहा जणांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पाच-सहा चालकांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. वाळू माफियांच्या वाढत्या मजुरीचा हा कळस म्हणता येईल. मारहाण करणाऱ्या वाळू माफियांच्या वाहन चालकांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौकशीत त्यांना बोलते करताच त्यांचे धनी कोण आहेत, ती नावे निष्पन्न होतील. त्यावरून त्यांच्यावर जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करावी जेणेकरून ते पुन्हा अवैध वाळू धंद्यात येऊ करण्याचे धाडस करणार नाहीत.

महसूल प्रशासनाच्या वतीने अवैध वाळू धंद्यांना रोखण्यासाठी यापुढे कारवाई होतच राहील. महसूल विभाग नित्याची कामे सोडून गिरणा तापी नदीच्या पात्रात रात्री बे रात्री जाऊन धाडी टाकण्याचे काम महसूल खात्यातर्फे करण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. त्याबद्दल महसूल विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. त्यांची हिंमत आणखी वाढण्यासाठी आता जळगाव जिल्ह्यातील जनतेकडून वाळू माफियांच्याविरुद्ध उठाव केला पाहिजे. त्यामध्ये विशेषतः गिरणा आणि तापी किनाऱ्याच्या गावातील जनतेचा विशेष पुढाकार असणे आवश्यक आहे. “गाव करी ते राव न करी” अशी म्हण आहे. ती सत्यात आणण्यासाठी जनतेकडून उठाव होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या टीम कडून होत असलेल्या कारवाईची हिंमत खचणार नाही.

अवैध वाळूच्या उपशामुळे गिरणा तापी नदी कोरड्या झाल्या आहेत. तर जळगाव जिल्हा वासियांना सिंचनासाठी थोडेच पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध होणार नाही. म्हणून जिल्हा वासियांचे हे संकट लक्षात घेऊन नदीपात्रात अवैध वाळू उपसासाठी ट्रॅक्टर अथवा इतर वाहन दिसताच गावकऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर सामुहिक रित्या जाऊन पकडून वाळू उपशाला प्रतिबंध केला, तर वाळू माफियांची नदीपात्रात वाहन टाकण्याची हिंमत होणार नाही. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा काठी बहाळ या गावचे आणि तेथील गावकऱ्यांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. त्यामुळे गावच्या चार ते पाच किलोमीटर गिरणापात्रात पूर्ण वाळूने भरलेला आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांना स्वतःचे बांधकाम करायचे असेल तर बैलगाडीने वाळू देऊ शकतात. त्यामुळे बहाळ परिसरातील शेतीतील सिंचन करण्यासाठी विहिरींना भरपूर पाणी असल्याने बहाळ गावाला कोकणाचे सौंदर्य प्राप्त होणार आहे. परिसर हिरवागार असून गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही, म्हणून आता जनतेकडूनच उठा होण्याची गरज आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.