अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग; साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्यास सुरुवात

0

 

अमळनेर जि.जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनासाठी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशी साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्यात येत आहे. यासाठी जमीन जेसीबीच्या मदतीने जमीन सपाटीकरणासह झाडेझुडपे तोडण्यात आली आहे. यानंतर जागेची आखणी करण्यात येणार असून मुख्य सभामंडप, ग्रंथदालन, भोजनगृह, पार्किंग आदिंचे काम हाती घेण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होत आहे. तब्बल ७२ वर्षांनंतर अमळनेर येथे होत असलेल्या या साहित्य संमेलनाच्या तयारीचा उत्साह अमळनेरकरांमध्ये दिसून येत आहे. ग्रंथदालन नोंदणी, प्रतिनिधी नोंदणीसह सर्वच कवीकट्टा, गझल कट्टा, बालमेळावा आदिंना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. साहित्य प्रेमींच्या या उत्साहामुळे हे संमेलन मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरेल, असा विश्वास आयोजक संस्था मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यासाठी प्रताप महाविद्यालयाच्या समोरील जागेची ग्रंथदिंडीच्या जागेची साफसफाई जोरात सुरू आहे. यासाठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंग अग्रवाल हे मेहनत घेत आहे.

अ.भा. मराठी साहित्य संमेलन पूज्य सानेगुरुजींच्या कर्मभूमीत होत असल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना मेजवानी मिळणार आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेरकरांना मोठी संधी मिळाली आहे. त्यासाठी अ.भा. मराठी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व संचालक मंडळाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.