रोटरीच्या कार्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण – आशा वेणुगोपाल

0

रोटरी वेस्ट तर्फे दहा महिलांचा गौरव

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शंभर वर्षांपेक्षा जास्त वाटचाल करणाऱ्या रोटरीचे नेतृत्व अर्थात आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा सन्मान महिलेला प्राप्त झाला. रोटरीच्या कार्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे असे रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या निर्वाचित व प्रथम महिला प्रांतपाल आशा वेणुगोपाल (नाशिक) यांनी प्रतिपादन केले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे तेजस्विनी रोटरी सन्मान 2023 सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सहप्रांतपाल अरुण नंदर्षी, अध्यक्ष सुनील सुखवानी, मानद सचिव विवेक काबरा, प्रकल्प प्रमुख मुनिरा तरवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात रक्तदान चळवळीत योगदान देणाऱ्या उज्वला वर्मा, वयाच्या 63 व्या वर्षी 42 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या विद्या बेंडाळे, चाळीस वर्षे रुग्ण सेवा देणाऱ्या सुमन लोखंडे, गतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या हर्षाली चौधरी, बचत गटातून महिलांना रोजगार उपलब्ध करणाऱ्या अर्चना महाजन, स्वतः अशिक्षित असताना कष्ट करून तीन मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या शोभा तायडे, शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोकिळाबाई पाटील (लोंढे, ता. चाळीसगाव), उद्योग क्षेत्रात कार्यरत नीलम बोंडे, स्वतः उच्चशिक्षित व पुणे शहर सोडून ग्रामीण भागात येऊन कार्य करीत इतरांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या वैशाली पाटील (दसनूर, ता. रावेर) आणि स्वतः रुग्ण असतानाही कॅन्सर रुग्णांसाठी कार्य करणारी महिला आदी दहा महिलांना तेजस्विनी रोटरी सन्मान 2023 ने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थींचा कार्य परिचय दीप्ती पिंपलीकर, अश्विनी दशपुत्रे, जया काबरा, प्रा. तनुजा महाजन यांनी तर अतिथींचा परिचय सीए. स्मिता बंदूकवाला यांनी करून दिला. शिल्पा सफळे यांनी गणेश वंदना सादर केली. प्रास्ताविक सुनील सुखवानी यांनी तर सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. आभार मुनिरा तरवारी यांनी मानले कार्यक्रमास रोटरी वेस्ट चे माजी अध्यक्ष नितीन रेदासनी, रमण जाजू, योगेश भोळे, अनंत भोळे यांचे विशेष सहकार्य लाभले तर निधी कोठारी व धनश्री चौधरी यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.