रोहित पवारांचा कट्टर समर्थक अजितदादांच्या राष्ट्रवादीत !

बारामती मतदानाच्या तोंडावर जबर झटका

0

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क 

राज्यात लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठे प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मानाचे पान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला शरद पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले भूषण सिंहराजे होळकर यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश देत थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

अक्षय शिंदे हे मूळचे चौंडी येथील असून रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांना कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता. अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर आणि एकूणच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहित पवार यांचे समर्थक बऱ्यापैकी राम शिंदे यांच्याकडे गेल्याचे अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी अक्षय शिंदे हे रोहित पवार यांच्या सोबतच होते.

आता लोकसभा निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातच अजित पवार यांनी मोठी खेळी खेळत रोहित पवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या अक्षय शिंदे यांना आपल्या पक्षात प्रवेश देत रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. अक्षय शिंदे हे धनगर समाजातील एक मोठे नेतृत्व म्हणून संपूर्ण नगर जिल्ह्याला परिचित आहेत. धनगर समाजातील युवकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असून त्याचा फायदा अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात देखील होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदान मोठ्या प्रमाणात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.