विधानसभा निवडणुकीनंतरही तुम्हीच मुख्यमंत्री असणार का ?

शिंदेंनी वेगळेच ‘टार्गेट’ सांगितले

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात पक्षात पडलेली उभी फूट, त्यांनी भाजपसोबत जात स्थापन केलेले सरकार या घटनांच्या पार्श्वभूमीवर होत असलेली लोकसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीच्या निकालातून मिळेल.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. त्यांच्यामुळे देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावली आहे. त्यांच्या कामाला महायुती सरकारच्या कामाची चांगली जोड मिळाली आहे, असे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले. गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने उत्तम काम केले. पायाभूत सुविधांच्या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी झाल्यास तुम्हीच मुख्यमंत्री राहणार का? असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर सध्याच्या घडीला आमच्यासाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची असेल, असे उत्तर शिंदेंनी दिले. ‘नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे याला प्राधान्य आहे. 2019 मध्ये आम्ही जितक्या जागा जिंकल्या, त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. मोदींचे सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणूक भविष्यातील विषय आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण होईल याचा विचार आम्ही करत नाही, असे शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप शिंदे आणि त्यांच्या बंडात सहभागी झालेल्या आमदारांनी अनेकदा केला. पण तेच अजित पवार महायुतीत आले आणि अर्थमंत्री झाले. त्यावरही शिंदेंनी भाष्य केले. ‘आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना आमच्याच मंत्र्यांना काम करता येत नव्हते. आमचे कार्यकर्ते तुरुंगात जात होते, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात होते. पण मुख्यमंत्री काहीच करत नव्हते,’ असे शिंदेंनी सांगितले.

काहीही आव्हानात्मक नाही
आम्ही भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. राज्य सरकार चांगले काम करते आहे. अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत आले. मोदींच्या कामाने प्रभावित होऊन ते महायुतीसोबत आले. त्यांच्या पक्षात समस्या असल्याने ते आमच्यासोबत आलेले नाहीत, असे शिंदे म्हणाले. तीन पक्षांचे सरकार चालवणे आव्हानात्मक वाटते का?, असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर आम्हाला सगळ्यांना लोकांची सेवा करण्याची आणि राज्याला पुढे न्यायचे आहे. उद्देश एक असल्यानं तीन पक्षांचे सरकार चालवणे आव्हानात्मक वाटत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.