जिल्ह्यात पुरवठा अधिकाऱ्यांच्या कारवाईत रेशन दुकानांचे परवाने रद्द…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये साठ्याची अनियमितता व इतर कारणांमुळे तीन दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाई मध्ये भिलाली, एकलहरे आणि भरवस येथील रेशन दुकानांचा समावेश आहे. या दुकानावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे अमळनेर तालुक्यात रेशन मालाचा गैरव्यवहार सुरू असल्याचा पुरावा असून तालुक्यातील रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे. तत्कालिन तहसीलदार मिलिंद वाघ आणि गोदाम व्यवस्थापक अनिल पाटील यांच्या काळात या दुकानांच्या चौकशा झाल्या होत्या.

अमळनेर तालुक्यातील एकलहरे, भरवस आणि भिलाली येथील रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप शासकीय नियमनुसार न करता त्याचा साठा करून ठेवला होता. याबाबत तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांना या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

त्यात भिलाली येथील दुकान क्रमांक ८४ येथे ४.६१ क्विंटल गहू व २१.७९ क्विंटल तांदूळ, एकलहरे येथील दुकान क्रमांक ८२ येथे १०.१७ क्विंटल गहू आणि १.८७ क्विंटल तांदूळ, भरवस येथील दुकान क्रमांक ६९ मध्ये १५.८८ क्विंटल गहू आणि ३१.७ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला होता. या दुकानांचा रितसर पंचनामा करण्यात आला. यात दुकानदारांनी साठवून ठेवलेला हा माल त्यांनी लाभार्थ्यांना वाटप न करता त्याचा साठा केल्याचे उघड झाले. याबाबातच अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जळगाव येथे सुनावणी घेतली. त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तिन्ही दुकानांचे परवाने रद्द केल्याचे आदेश काढले आहेत.

“अमळनेर तालुक्यातील रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याने यात मोठा गैरव्यवहार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत तक्रार केल्याने हा गैरव्यवहार उघडकीस आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन थेट कारवाई केली आहे. यात समाविष्ट असलेले अधिकारी व इतरांवर देखील कारवाईसाठी लढा सुरू असेल.” -जितेंद्र ठाकूर, तक्रारदार, अमळनेर

“तालुक्यातील संबंधित दुकानांची १० मार्च २०२२ ला चौकशी करण्यात आली होती. यात लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत नसणे, दुकानात भावफलक नसणे, हिशोब रजिस्टर तसेच उचल व शिल्लक साठा यात तफावत आढळल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दुकानांवर कारवाई केली आहे.” – अमोल पाटील प्रभारी तहसीलदार, अमळनेर

Leave A Reply

Your email address will not be published.