‘ब्लॅक’मध्ये खरेदी केलेले १४ हजार रेमडेसिविर पडून

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

औरंगाबाद :‘ब्लॅक’मध्ये खरेदी केलेले १४ हजार रेमडेसिविर पडून. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अवघ्या महिनाभरात परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यातही शहरात ९२ टक्के रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांत कोविड औषधी, ऑक्सिजनचा वापरच कमी झाला आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येपुढे रेमडेसिविर कमी पडले. जवळच्या रुग्णासाठी नातेवाइकांनी अक्षरश: हजारो रुपये मोजून ब्लॅकमध्ये रेमडेसिविर खरेदी केले. मात्र, जिल्ह्यात सध्या १४ हजार रेमडेसिविर पडून असून त्यांना कोणीही विचारतही नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण आणि रेमडेसिविर इंजेक्शन असे समीकरणच झाले होते; कारण त्यावेळी गंभीर रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. नातेवाइकांना रेमडेसिविरचा शोध घेत भटकावे लागले. परिणामी, रेमडेसिविरचा काळा बाजारही झाला. मात्र, सध्या तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. बहुतांश रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे सध्या रेमडेसिविरचा वापर कमीच आहे. ऑक्सिजनसह औषधींचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत आहे. शहरातील सक्रिय २,८०५ कोरोना रुग्णांपैकी तब्बल २,६०२ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.

रेमडेसिविरची काय स्थिती?

जिल्ह्यात रेमडेसिविरचा शासकीय साठा ११४९६ आणि खाजगी साठा ३०८९ इतका आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (औषध) सहआयुक्त संजय काळे यांनी दिली.

ऑक्सिजनची काय स्थिती?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबादेत २४ तासांत ६० टन ऑक्सिजन लागत होता. रोज ऑक्सिजन येतो आणि संपतो, अशी जिल्ह्याची स्थिती होती; परंतु सुदैवाने औरंगाबादेत ऑक्सिजनअभावी कोणतीही मोठी घटना तेव्हा घडली नाही. सध्या औरंगाबादेत रोज ५.५ टन ऑक्सिजन लागतो. म्हणजे दुसऱ्या लाटेत एका दिवसांत संपणारा ऑक्सिजन आता १० दिवसांत संपतो. जिल्ह्यात सध्या ८४.३४ मे. टन इतका ऑक्सिजन साठा आहे.

पुरेसा औषधीसाठा

कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे. त्यातही गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. औषधी साठाही पुरेसा आहे.- डाॅ. सुनीता गोल्हाईत, आरोग्य उपसंचालक

घाटीत महिनाभर पुरेल इतकी औषधी

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या दृष्टीने पूर्ण नियोजन करण्यात आले. महिनाभर पुरेल इतका कोविड रुग्णांसाठीचा औषधी साठा आहे. काही औषधी इतर रुग्णांसाठीही वापरात येतात.- डाॅ. वर्षा रोटे-कागिनाळकर, अधिष्ठाता, घाटी

 

Leave A Reply

Your email address will not be published.