जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटकांची उपासमार होऊ नये यासाठी सरकारने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना आता सप्टेंबर २०२२ पर्यंत मोफत धान्याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मध्यंतरी हमालांच्या संपामुळे अन्न महामंडळाकडून धान्याची उचल झाली नसल्याने एप्रिल महिन्याच्या धान्याचे वितरण या लाभार्थीना झाले नव्हते. मात्र, आता धान्याची उचल झाली असल्याने रेशन दुकानदारांना मोफत धान्याचे वाटप करण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.
अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य देण्यात येत आहे. महिन्याचा अपवाद वगळला तर आता मात्र, धान्य वितरण व्यवस्था सुरळीत सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. करोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे अन्नधान्याचा तुटवडा असल्याची स्थिती गोरगरिबांना पुढे होती. त्या काळात नागरिकांना मोफत धान्याने मोठा दिलासा दिला. कारण कोरोना काळात रोजगारांची मारामार होती. त्यामुळे कमवायचे कसे आणि पानावर आणायचे तरी किती, हा प्रश्नच लाखमोलाच झाला होता. आता करोनाचा कालावधी मागे पडला असून, जनजीवन सुरळीत झाले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक महिन्याला तांदूळ २ रुपये किलो तर गहू ३ रुपये किलो दराने देण्यात येतो. जिल्ह्यात सध्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे. तसेच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड ३ किलो तांदूळ आणि २ किलो गव्हाचे धान्य मोफत दिले जाते.
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड १५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू दिले जातात. हे धान्य गोरगरीब कुटुंबाला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आधार ठरला आहे.