मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर ; एनआयएकडून अलर्ट जारी

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील एक मेल एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये पोलिसांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तान या देशात प्रशिक्षण घेतलेला एक हस्तक मुंबईत आला आहे. सरफराज मेमन असं या संशयिताचं नाव असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. संशयित इंदोरचा असल्याचा दावा सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एनआयएकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जो मेल आला आहे, त्या मेलमध्ये सरफराज हा मध्यप्रदेशमधील इंदोरचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे याबाबत आता मध्यप्रदेश सरकारला देखील माहिती देण्यात आली आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे लायसन्स, परवाना, व्हिसा यासह आधार कार्डची प्रतही मुंबई पोलिसांना मेल करण्यात आली आहे. या मेलनंतर संबंधित व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

मुंबई कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असतं. 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे. मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.