जेष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांचे निधन; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

0

 

पुणे; मध्ये उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज (Rahul Bajaj ) यांचं आज निधन झालं आहे. राहुल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. वयोमान आणि त्याचवेळेस हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजता त्यांचं रुबी हॉल क्लिनिकमधे निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

“देशाच्या उत्पादन क्षेत्रात राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. सामाजिक कार्याला त्यांनी नेहमीच मदत केली. समाजाबद्दल कणव असलेला उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतासह सर्वांचचं नुकसान झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

“राहुल बजाज यांनी आमच्या कुटुंबावर खूप प्रेम केलं. त्यांच्या निधनाची बातमी पवार कुटुंबासाठी दुख:द घटना आहे. कितीही अडचण आली तरी ते कायम आमच्यासोबत होते, अशा भावना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

“राहुल बजाज हे उद्योग जगतातील अत्यंत महत्वाची व्यक्ती होती. बजाज समुहाला पुढे नेण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही एक पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.