रवींद्रनाथ टागोर यांचा आहे महाराष्ट्राशी विशेष संबंध

0

लोकशाही विशेष लेख

 

अखिल जगाचे गुरुदेव, ज्यांच्या अतिसुंदर तसेच संवेदनशील ‘गीतांजलीने’ संपूर्ण जगाला भुरळ पाडली, १९१२ चा ‘साहित्यातील नोबेल’ भारताला मिळवून देण्याचा बहुमान ज्यांनी दिला, अशा रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला. देवेंद्रनाथ आणि शारदादेवी यांचे ते तेरावे अपत्य होते.

रवींद्रनाथांनी त्यांच्या जीवनात अनेक क्षेत्रांत आपले कौशल्य दाखवले. ते एक उत्कृष्ट कवी, कादंबरीकार, नाटककार तर होतेच सोबतच अव्वल दर्जाचे चित्रकार, संगीतकार आणि समाजसुधारक ही होते. रवींद्रनाथ ज्यांना ‘बंगालचा बार्ड’ (Bard of Bengal) ही म्हटले जाते, त्यांचा बंगालच्या साहित्यावर एवढा प्रभाव होता की, बंगाली साहित्याची विभागणी ‘रवींद्रपूर्व’ व ‘रवींद्रोत्तर’ अशी केली जाते.

रवींद्रनाथांच्या वैचारिक सृजनशक्तीची कल्पना आपल्याला यावरूनच येऊ शकते की, रवींद्रनाथांनी वयाच्या अगदी आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी ‘भानुसिंग’ या टोपणनावाचा वापर करून अनेक कविता लिहिल्या. ते रवींद्रनाथच आहेत ज्यांनी भारताला ‘जन गण मन’ दिले तसेच बांग्लादेशला ‘आमार शोनार बांग्ला’ दिले. असे दोन देशांच्या राष्ट्रगीतांचे लेखन करणारे रवींद्रनाथ निश्चितच अद्वितीय ठरतात.

शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक प्रयोग ठरलेल्या ‘शांतीनिकेतनची’ उभारणी ही टागोरांची दूरदृष्टी दर्शविते. त्यांनी श्री-निकेतन’ नावाच्या एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना ही केली. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठीचे त्यांचे आवाहन त्यांची समाजाप्रती असणारी ओढ दर्शविते.

रवींद्रनाथ कमालीचे राष्ट्रभक्त होते, हे त्यांच्या जीवनातील एका प्रसंगातून दिसून येते. ब्रिटिश सरकारने त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९१५ साली ‘सर’ ही पदवी प्रदान केली होती. परंतू १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर (Jallianwala Bagh massacre) त्यांनी ही पदवी सरकारला परत केली.

रवींद्रनाथांच्या साहित्यात यमकप्रचुरता, आशावाद व गेयता प्रामुख्याने दिसून येतात. काव्यगटात ‘गीतांजली’ व्यतिरिक्त त्यांच्या ‘मानसी’, ‘सोनार तोरी’, ‘बलाका’ या उत्कृष्ट कलाकृतीही अविस्मरणीय ठरतात. त्यांनी ‘चतुरंग’, ‘शेषेर कविता’ (शेवटच्या कविता), ‘चार अध्याय’, ‘नौका डुबी’, अशा चार लघुकादंबऱ्या व आठ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. ‘वाल्मिकी प्रतिभा’, ‘चंडालिका’, ‘विसर्जन’, ‘चित्रांगदा’, ‘राजा’, ‘मायार खेला’ ह्या त्यांच्या काही नाट्यकृती ठरतात. नाटकांसोबत टागोरांच्या ‘नृत्य- नाटिका’ विशेष प्रसिद्ध आहेत. रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह ‘गलपगुच्छ’ (कथागुच्छ) एक पर्वणीच आहे.

रवींद्रनाथांच्या २२३० गीतांचा समावेश रवींद्रसंगीतात होतो. अभिजात भारतीय संगीताचा प्रभाव असलेले रवींद्रसंगीत नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्थान ठरले. रवींद्रनाथांनी सर्वप्रथम रचलेले गीत ‘ गगनेर खाले रविचंद्र दीपक ज्बले’ हे तर शेवटचे गीत ‘नूतन देखा दिक आरो बारो’ हे ठरते.

रवींद्रनाथांचा आणि महाराष्ट्राचा संबंधही तसाच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. रवींद्रनाथांवर संत तुकारामांच्या (Saint Tukaram) साहित्याचा असा काही प्रभाव पडला की त्यांनी संत तुकारामांचे काही अभंग बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. पु. ल. देशपांडे (Pu. L. Deshpande) आणि द. रा. बेंद्रे या साहित्यकारांवर रवींद्रनाथांचा प्रभाव पडून आलेला दिसतो.

रवींद्रनाथांची विचारशैली किती सकारात्मक व उर्जावान होती हे त्यांच्या प्रार्थना नावाच्या कवितेतून दिसू शकते.

‘बिपदे मोरे रक्षा करो ए
नए मोर प्रार्थना
बिपदे आमीना जेन
करि भय ।।’
म्हणजेच,
‘विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही तर
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा आहे.’

अशा विविध कलाकृती देणाऱ्या रवींद्रनाथांचे शेवटचे दिवस कष्टदायक होते. कदाचित त्यामुळेच त्यांच्या शेवटच्या काही काव्यांत मृत्यूविषयक चिंतन आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. १९४० सालचा त्यांचा कोमा जीवघेणा ठरला आणि ७ ऑगस्ट १९४१ रोजी कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित घरात त्यांचा मृत्यू झाला. ‘जोदी तोर डाक शूने केयू ना आशे तोबे एकला चलो रे’ अशी एकला चलो रे ची साद देणाऱ्या रवींद्रनाथांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे शक्य नाही.

कु. पूजा निचोळे, जळगांव

Leave A Reply

Your email address will not be published.