लोकशाही न्यूज नेटवर्क
कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आठ माजी नौसेना अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारत सरकारच्या याचिकेनंतर आठ जणांच्या मृत्यूच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारत सरकारच्या प्रयत्नांना यश आल्याचं चित्र आहे. पीटीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रकायाने सांगितले की, माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेप्रमामने कतार कोर्टाचे दरवाजे भारत सरकारने ठोठावले होते. भारताने याप्रकरणी याचिका दाखल केली होती. कतार कोर्टाने माजी नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केल्याची माहिती आहे. कायदेशीर टीम अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी संपर्कात आहे. सुनावणीवेळी भारतीय राजदूत आणि अधिकारी कोर्टात उपस्थित होते.
आम्ही नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबांसोबत सुरुवातीपासून उभे आहोत. आम्ही कतार सरकारकडे हे प्रकरण वारंवार उपस्थित करत आहोत. अधिकाऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही पुढेही प्रयत्न करत राहू असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
आरोप काय आहेत?
कतारमधील दाहरा कंपनीत काम करणारे आठ भारतीय यांनी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये आठ भारतीय माजी अधिकाऱ्यांनी इस्राईलसाठी हेरगिरी केल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना कतार कोर्टाकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. असे असले तरी कतारने याप्रकरणी कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही.