पुणे किडनी रॅकेट प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकच्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली, असा आरोप त्यांच्यावर आहे. कोल्हापूरच्या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागले. संबंधित महिलेने आणि एजंटांनी बनवून दिलेली खोटी कागदपत्रे याची सत्यता पडताळणी डॉ. तावरे अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका समितीवर ठेवण्यात आला.

पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले होते. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी यासंबंधीचे आदेश काढले होते. तावरे हे विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. तर महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर वैद्यकीय विभागाने रुबी हॉल क्लिनिक आणि ससूनच्या सर्वोपचार अधीक्षकांवर कारवाई केली होती. आता याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. किडनी तस्करीप्रकरणी आरोग्य विभागाने सुरुवातीला रुबी हॉल क्लिनिकचा प्रत्यारोपण परवाना रद्द केला. त्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षण विभागानेदेखील चौकशी समिती नियुक्त करत ही कारवाई केली होती. तर तावरेंचे निलंबन केल्यानंतर अधीक्षकपदाचा तात्पुरता पदभार उपाधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. तावरे हे त्यांच्या मूळ न्यायवैद्यक विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.