खोकल्याच्या औषधाऐवजी रुग्णाला दिले रक्त वाढीचे औषध !

0

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून साकळी येथील एका महिला रुग्णाला खोकल्याच्या औषधा ऐवजी चक्क रक्त वाढीचे औषध देऊन अजब कारभाराचा नमुनाचा सदर केंद्राकडून दाखविला गेला असून आपण रुग्णांच्या जीवाशी किती भयानक खेळ खेळतो आहे ? याचा प्रत्यय सर्वांसमोर आणून दिलेला आहे. या प्रकरणाची आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन चौकशी करण्यात यावी तसेच प्रकरणाशी संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सदर केंद्रात औषध निर्मात्याची जागा रिक्त असल्याने त्या जागेवर बसून कोणताही कर्मचारी रुग्णांना औषध देत असतो या धक्कादायक प्रकारावरून संबंधित प्रा. आरोग्य केंद्राचा कारभार किती भोंगळ व वाऱ्यावर आहे हे दिसून येतो आहे.

याबाबत तक्रारदारांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, साकळी ता. यावल येथील रहिवासी असलेल्या गयाबाई शांताराम चौधरी (वय ५८) यांना आठ-दहा दिवसांपूर्वी खूप खोकला येत असल्याने आणि जीव घाबरत असल्याने प्राथमिक उपचारासाठी त्या गावातील म्हणजे साकळी प्रा.आ. केंद्रात गेल्या. त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासल्यानंतर औषधी गोळ्या घेण्यासाठी औषध निर्माता कक्षाकडे पाठवण्यात आले. मात्र त्या ठिकाणी त्यांना खोकल्याचे पातळ औषध न देता चक्क रक्त वाढीची पातळ औषधाची बाटली देण्यात आली. घरी आल्यानंतर त्या औषध घेत असतांना गयाबाई चौधरी यांच्या मुलाचे आई कोणते औषध घेते आहे ? याकडे अचानक लक्ष गेले. आई अशिक्षित असल्याने तिला लिहीता- वाचता येत नसल्याने ती खोकल्याच्या आजारावर चक्क रक्तवाढीचा औषध घेत आहे हे लक्षात आल्यावर मुलगा प्रियांक याने आईला औषध न घेण्याचे सांगितले. सदर औषध खोकल्याचे नसून रक्त वाढीचे आहे असे मुलाने गयाबाई चौधरी यांना सांगितले. संबंधित महिलेने खोकल्यावर रक्त वाढीचे औषध न घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. झालेल्या प्रकाराची प्रियांक चौधरी याने सर्व प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.

गयाबाई चौधरी यांना थायराइड व रक्तदाबाचा आजार आहे, असे प्रियांक चौधरी यांनी सांगितले. तसेच दि.१३ रोजी प्रियांक चौधरी हे आज प्रा.आ. केंद्रात गेले असता खोकल्याचे पातळ औषध मागितले असता त्यांना खोकल्याचे पातळ औषध मिळाले नाही. जेव्हा त्यांनी सदर औषधाबाबत मागणीचे रेकॉर्ड केंद्राकडे मागितले व केंद्रात येणाऱ्या तोंड ओळखीच्या लोकांनाच खोकल्याचे पातळ औषध दिले जाते असा आरोप केला आणि आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला. यावर तात्काळ एका कर्मचाऱ्यांनी चौधरी यांना खोकल्याच्या पातळ औषधाची बाटली काढून दिली. मागणीनुसार केंद्रात खोकल्याचे पातळ औषध येते तेव्हा हे औषध कर्मचारी वाटून घेतात. आपल्या घरी ठेवतात व आपल्या मर्जीतील लोकांना देत असतात. त्याच प्रमाणे केंद्राकडून सरसकट सर्व रुग्णांना आयर्न रक्त वाढीचे औषध दिले जाते. कर्मचारी अरेरावी करतात. दमदाटी करतात. असे रुग्णांचे म्हणणे आहे.

एकूणच साकळी सारख्या मोठ्या गावात रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातो, मनमानी व भोंगळ कारभार चालवला जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. जसे काही या केंद्राचं कोणी वालीच राहिलेलं नाही का ? असे दिसून येत आहे. या केंद्रात विशेष करून गेल्या अनेक दिवसांपासून औषध निर्मात्याची जागा रिक्त आहे. त्यामुळे या जागेवर कोणीही कर्मचारी बसून औषध वाटप करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या अगोदरही सदर केंद्रात रुग्णाबाबत अनेक तक्रारींचे प्रकार घडले आहे. तेव्हा याकडे वरिष्ठ आरोग्य प्रशासनाने लक्ष द्यावे व केंद्रातील रिक्त कर्मचाऱ्यांच्या जागा तात्काळ भरण्यात यावा व केंद्राचा राम भरोसे कारभार व्यवस्थित करण्यात यावा. अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

मला गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी खोकल्याचा व जिव घाबरण्याचा त्रास होत असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी मी प्रा. आ. केंद्रात गेले असता त्या ठिकाणी खोकल्यावर औषध मागितले असता मला रक्त वाढीचे औषध दिले. ही बाब माझ्या मुलाने माझ्या लक्षात आणून दिली. माझ्या मुलाच्या सतर्कतेमुळे मी ते रक्त वाढीचे औषध घेतले नाही. त्यामुळे मला काही अपाय झाल्या नाही.
– गयाबाई चौधरी (महिला रुग्ण, साकळी ता. यावल)

दर महिन्याला केंद्रात खोकल्याच्या औषधांसह इतरही वेगवेगळ्या आजारावरच्या औषधांची मागणी केली जाते. खोकल्याचे जेवढे औषध येते ते संबंधित रुग्णांना बरोबर देण्यात येते. झालेल्या प्रकाराच्या दिवशी मी केंद्रात नव्हते.मात्र सदर प्रकार हा खरोखर चिंतेचा विषय आहे. त्या बाबत माहिती घेते.
– डॉ. स्वाती कवडीवाले (वैद्यकीय अधिकारी, साकळी ता. यावल)

माझी आई अशिक्षित असल्याने तिला प्रा. आ. केंद्रातून कोणते औषध मिळाले हे तिला कळाले नाही. माझ्या सतर्कतेमुळे तिने खोकल्यावर रक्त वाढीचे औषध घेतले नाही व आईची तब्येत खराब झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. सदर केंद्रात खोकल्याचे औषध न देता रक्त वाढीचे औषध दिले जात आहे. ही बाब अतिशय गंभीरपणे असून रुग्णांच्या जीवाशी सर्रास खेळ सुरू आहे. तसेच कर्मचारी उडवा उडवीचे उत्तरे देत असतात. झालेल्या प्रकाराबाबत चौकशी करण्यात यावी.
– प्रियांक चौधरी (रुग्ण महिलेचा मुलगा)

Leave A Reply

Your email address will not be published.