खड्डे खोदून घातक केमिकल्स सोडले ; जळगावातील प्रकार

0

पोलीस, मनपा ,प्रदूषण मंडळाच्या पथकाची पाहणी

जळगाव : – मोकळ्या जागेत खड्डे खोदून त्यात घातक असे केमिकल्स सोडले जात असल्याची धक्कादायक घटना खान्देश सेंट्रल मॉलच्या मागिल बाजूला उघडकीस आली आहे. एका गुन्ह्याचा तपासासाठी खान्देश सेंट्रल मॉल परिसरात आलेल्या पोलिसांना हे केमिकल दिसून आल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्त पाहणी केली. तसेच केमिकल्स कोणत्या कंपनीचे आहे, याचा शोध घेवून संबधित कंपनी मालकाला नोटीस बजाविण्यात येणार असून केमिकल्स युक्त मातीची पुणे येथे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच केमिकल्सचे नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

गोविंदा रिक्षा थांब्याजवळ एका तरुणावर चॉपर हल्ला झाला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस संशयिताला घेऊन घटनास्थळी गेले असता तेथे वेगळा वास येऊ लागला. पोलिसांनी पुढे जाऊ पाहिले असता तेथे काहीतरी केमिकल्स असल्याचे दिसून आले. ही माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी व मनपाचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना दिली.

त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे दोन खड्डयात केमिकल्स साचलेले आढळून आले. त्यांनी प्रदुषण नियंत्रण महामंडळाशी संबंधित प्रकार असल्याने उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत यांना ही माहिती दिली. ते देखील घटनास्थळी दाखल झाले. हे केमिकल्स कोणत्या कंपनीचे आहे, त्याचा शोध घेऊन शनिवारीच कंपनी व्यवस्थापनाला नोटीस बजावली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत यांनी दिली.
कंपन्यामधून निघणारे घातक केमिकल्सची पुण्यात शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाणार असून त्याचा खर्च संबधित कंपनीकडून वसुल करण्यात येणार आहे. ही केमिकल्स युक्त माहित पुणे येथे घेवून जाण्यासाठी टेक्नो असोसिएटस् या कंपनीला प्राधिकृत केले आहे. शनिवारीच संपूर्ण माती व केमिकल्स टँकर्सच्या सहाय्याने पुण्यात नेले जाणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.