आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागे माजी स्नान जे करिती ।।

0

लोकाध्यात्म विशेष लेख

पंढरपूर भू लोकीचे वैकुंठ आहे अशी त्याची ख्याती पुराणात वर्णन केली गेली आहे. पंढरी नगरीत साक्षात देवांचा देव अनंत कोटी, ब्रम्हांडनायक, राजाधिराज, पंढरीनाथ, महाराज यांचं हे निवासस्थान आहे. पंढरीच्या सुखा। अंतःपार नाही लेखा || पंढरीसी जाता  सुख वाटे जीवा || अशा शेकडो अभंगातून पंढरी क्षेत्र महिमान साधू संतानी वर्णन केले आहे.

पुंडलिका भेटी  परब्रम्ह आले गा। चरणी वाहे भीमा  उद्धरी जगा || असे भगवंताच्या आरतीत म्हटले गेले आहे. अठ्ठावीस युगे झालीत तरीही  हा देव पंढरपूरात वामांगी रखुमाई सह उभा आहे. हजारो लाखो भाविकांचे आशास्थान, श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरची वारी वर्षभर सुरू असते. तरीही आषाढी आणि कार्तिकी वाऱ्यांना अनन्य साधारण महत्व आहे.  पंढरीला  गेल्यानंतर मानवाला सुख, शांती, समाधानाची, परम अनुभूत मिळतेच तर दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीयेला। याची प्रचिती येते.

पंढरपूरात कार्तिकी गुढीपाडवा, माघी  एकादशी अशा सुमुहूर्तावर  भाविक भक्त वारकरी आनंदाने नाचत, गात येतात व आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेतात.  वारकरी पंथाची एक स्वतंत्र अशी धारणा आहे , संहिता आहे जाताना अंगावर पांढरा सदरा, डोक्यावर टोपी, धोतर, कपाळावर अष्टगंधाचा वा चंदनी  टिका- बुक्का, गळ्यात तुळशीमाळा, हातात भगवी पताका, ताळ, वीणा  मृदंग घेऊन पंढरीत आल्यावर  आधी चंद्रभागा स्नान मग पुंडलिकाचे दर्शन नामदेव पायरी शेजारी चोखोबाचे  दर्शन आणि ओळीने पांडुरंगाचे दर्शन असा वारीचा वारकऱ्यांचा व वैष्णव भक्तांचा  नेम आहे.

आधी वसली पंढरी। मग वैकुंठ नगरी ।। अनादी अनंत काळापासून  पृथ्वीतलावर पंढरी नगरी वसली आहे. द्वारकानगरी समुद्रात बुडवून भगवान विष्णूंनी  कलियुगाप्रारंभी दिंडीरवनात आले व भक्तराज पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत एवढे मग्न झाले आहेत की भगवंत आले तरी त्याला कळले नाही. मग देवांनी सांगितले अरे पुंडलिका मी तुझी भक्ति पाहून तुला भेटायला आलो. थांबा भगवंता माझ्या मांडिवर माझ्या वडिलांचे शीर आहे. ही विट घ्या यावर उभे राहा भगवंताच्या पायावर तेव्हापासून लोक नतमस्तक होत आले. परब्रम्ह सावळे सगुन रूप मनोहर चंद्रभागेच्या काठावर माता रुख्मिणीसह या ठिकाणी उभे आहेत म्हणून पंढरीच्या सुखाला अंत नाही..!

विश्वजननी आदिमाया शक्ति भगवती देवी रुख्मिणी माता वामांगी भगवंताच्या डावीकडे उभ्या आहेत. अठरा पगड जाती धर्माचे संत परमहंस या ठिकाणी भगवंताच्या सेवेसाठी रमले राहिले व अखेर समाधीस्थ झाले. त्या वैभवी नगरीचे वर्णन अठरा पुराण, चार वेद, सहा शास्त्रात उपनिषदांत केले गेले आहे. या घोर कलियुगात संसार सुखाची मोहमाया त्यागून संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, जनाबाई, निळोबा, चोखामेळा, गोरोबाकाका यांनी व इतरांनी देवाची थोर भक्ति केली. संकट काळात भगवंत त्यांचेकरिता धावून आले. उध्दार झाला कुळ, गोत्र, याती  यांनी  पवित्र झाल्या आजही संत कबीर, संत सावता महाराज, नरहरी सोनार अशा कितीतरी संतानी आपने कर्म करतांना भगवंताला आळवावा व आनंदाचे डोही आनंद तरंग याची स्वानंदे अनुभूती घेऊन संसाराची नांव भवसागर पार करून मुक्ती पंथाच्या किना-यावर नेली. संत कानहोपात्रा, संत बहिणाई, संत सखुबाई सजन कसाई या संताजी देवाला आपल्या हृदयात बंदिस्त केले. शेवटी त्यांनी नश्वर  देहाचा त्याग करून त्यांनी आपल्या  परमार्थाची गोडी लावून गेले.

पंढरपूरचा विठोबा म्हणजे वारकऱ्यांचा श्वास अखंड चिंतन भजन व इतर नवविधा भक्तीतून ज्यांनी ज्यांनी  भगवंताला आपलेसे केले त्यांना विठूमाऊलींनी  रोकडा प्रचिती आणून  दिली. दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भांवे ओवाळती ||  विठुरायाच्या आरतीच्या या ओवींमधून दर्शनाचे महत्व विषद करण्यात आले आहे. दर्शन घेतांना हेडा लपवून, लववून मगते घ्या त्या द्वारे प्रमुक्ती मिळेल असे नामदेव महाराज म्हणतात.

विठुरायाची मूर्ती शालीग्राम पाषाणाची असली तरी भी स्वयंभू आहे. भारतावर अनेक वर्षे यवनांचे राज्य होते. मूर्तीपूजेला त्यांचा विरोध होता अनेक राजांनी पंढरपूर तुळजापूर आदि  देवस्थानावर स्वाऱ्या केल्या पण विठुरायाची मूर्ती अबाधित राहिली. विठू माझा लेकुरवाडा। संगे गोपाळांचा मेळा || असा जीवीचा जिव्हाळा कुटुंबवत्सल विठ्ठल पंढरीचा राणा भक्तांचा पाठीराखा आहे. पंढरी नगरी सारखी जगाच्या पाठीवर दुसरी नगरी नाही, असे वचन ग्रंथराव महिपती बुवांनी भक्तविजय ग्रंथात केले आहे. माझे माहेर पंढरी। आहे भीवरीच्या तीरीं अशी पंढरी नगरी भक्तांना भक्तीचा बगीचा आहे. या देवाला लोक पूर्वी उराउरी भेटायचे आता पदस्पर्श दर्शनाने व मुखदर्शनाने दर्शन होत असते फक्त ह्दयात भांव असला पाहिजे म्हणजे भक्ति फलिभूत होते..!

रमेश जे. पाटील 

(ज्येष्ठ पत्रकार) 

आडगाव ता. चोपडा

९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.