मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील पोलिस पाटलांसाठी आनंदाची बातमी आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन, भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्त्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नागरगोजे यांनी व्यक्त केले.
स्थानिक विश्रामगृह शेगाव येथे आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. स्थानिक विश्रामगृह येथे बुलडाणा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी समितीची आढावा बैठक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक प्रसिद्धीप्रमुख संतोष मोरे पाटील किन्ही महादेव यांनी केले. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मागण्यासंदर्भात संघटना प्रयत्नशील असून शासनाने सुद्धा मानधन वाढीसाठी अनुकूलता दर्शविली.
येणारा काळ पोलीस पाटील यांचेसाठी आशादायी असून, पोलीस पाटील यांनी आपल्या कामाप्रती जागरूक असावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी विषयी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी विस्तृत विवेचन करून पोलिस पाटील यांना नियमित भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्याध्यक्षांना अवगत केले.