‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते उपक्रमास आजपासून सुरूवात
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या एलईडी वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.
मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा. योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करत जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी दिल्या.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम शहरी, आणि गावपातळीवर राबविण्यात येणार असून यासाठी रुटमॅप तयार करण्यात यावा. जिल्हा प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी सक्रियपणे सहभागी होऊन आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात. केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवित आहे. त्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा ते गावपातळीवर चित्ररथाद्वारे जिंगल्स, पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनी-चित्रफिती, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार –प्रसिद्धी करण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावर मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, तलाठी यांचाही सहभाग घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिल्या आहेत.
आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर या प्रसिद्धी मोहिमेत भर दिला जाणार आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या व्यक्तींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत. अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी प्रयत्नरत आहे. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रत्येक गावात पोहोचविली जात आहे. सुमारे १० फिरते वाहन जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहेत.