‘या’ विद्यार्थ्यांना JEE NEET साठी मिळणार अर्थसहाय्य

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जेईई, नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुसूचित जाती संवर्गातील इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यांना जेईई, नीट या प्रवेश परीक्षांच्‍या तयारीसाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य मिळेल. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (बार्टी) यांच्‍यातर्फे योजना राबविली जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्‍छुक पात्रताधारक विद्यार्थ्यांना सोमवार (ता. २७) पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल.

 

 ‘बार्टी’तर्फे योजना 

अभियांत्रिकी शिक्षणासाठी जेईई मेन्‍स, तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षेच्‍या आधारे प्रवेश दिला जातो. या परीक्षांमध्ये अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी ‘बार्टी’तर्फे योजना उपलब्‍ध आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्‍यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे.

२०० पात्र विद्यार्थ्यांची निवड

मुंबईबरोबर छत्रपती संभाजीनगर, पुणे व नाशिक या ठिकाणी हे प्रशिक्षण उपलब्‍ध आहे. ‘बार्टी’च्‍या योजनेंतर्गत ‘जेईई’साठी १०० आणि ‘नीट’साठी १०० असे एकूण २०० पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्‍यासाठी दहावीतील गुणांच्‍या आधारे प्राधान्‍य निश्‍चित केले जाणार आहे. निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्‍ध असेल. ७५ टक्क्‍यांपेक्षा अधिक उपस्‍थिती असलेल्‍या विद्यार्थ्यांनाच मासिक विद्यावेतन अदा केले जाणार आहे.

 

अटी व शर्ती 

दरम्‍यान, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्‍याच्‍याकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला, अधिवास दाखला असावा. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित असावा. तसेच, त्‍याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्न आठ लाखांपर्यंत असावे.

 

५% जागा आरक्षित 

उपलब्‍ध असलेल्‍या २०० जागांमध्ये काही जागा आरक्षणाने राखीव राहणार आहेत. यात ३० टक्‍के जागा विद्यार्थिनींसाठी आरक्षित राहतील. चार टक्‍के दिव्‍यांग विद्यार्थी, पाच टक्‍के अनुसूचित जातीअंतर्गत वंचित जातीतील विद्यार्थी, एक टक्का जागांचे आरक्षण अनाथ उमेदवारांसाठी असणार आहे. विशेष बाब म्‍हणून पाच टक्‍के जागा आरक्षित ठेवल्‍या जातील.

 

असा मिळणार लाभ

या योजनेंतर्गत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे. यासोबत प्रशिक्षण कालावधीत दर महिन्‍याला सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. अभ्यास साहित्‍य खरेदीसाठी एकदाच एकरकमी पाच हजार रुपयांची सहाय्यता केली जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.