जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महापालिकेतर्फे शहरातील प्लास्टिक कचरा हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.२४) शहरातील विविध भागातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. आता दर बुधवारी सफाई कर्मचाऱ्यांसोबत शहरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले की, शहरात दैनंदिन साफसाई होते. परुंतु मुख्य रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक पिशव्या तसेच तत्सम कचरा पडलेला निदर्शनास येत असतो. त्याचा विपरीत परिणाम साफसफाईच्या कामकाजावर दिसून येत आहे. शहरात यापूर्वी आठवड्यातून एकदा प्लास्टिक साफसफाई मोहीम राबविण्यात येत होती.
सद्यपरिस्थितीत सणाचे दिवस असल्याने नागरिक व व्यावसायिक साफसफाई केल्यानंतर निघालेला कचरा इतरत्र रस्त्यावर फेकून देत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्याच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा संकलन मोहीम आजपासून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज शहरातील विविध भागात सफाई कर्मचाऱ्यांतर्फे साफसाई मोहीम राबविण्यात आली. सर्व ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शहरातील प्लास्टिक कचरा साफसफाई करण्यासाठी दर बुधवारी सफाई कर्मचाऱ्यांतर्फे प्लास्टिक कचरा संकलन मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे.
उदय पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका
“जळगाव शहरात प्लास्टिक कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे आता प्लास्टिक कचरा हटविण्यासाठी महापालिका मोहीम राबवित आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे”