धुळ्यात साठीच्या आसपास मतदान !

डॉ. भामरे, डॉ.बच्छावांचे भवितव्य मतपेटीत बंद

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या सहा विधानसभा मतदारसंघांतील 1 हजार 969 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. दुपारी काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू होते. मात्र, दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. दरम्यान, भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्ष व आरोप-प्रत्यारोपाला सोमवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. मतदारांनी भावी खासदाराचे आपल्या मतदानातून भविष्य सीलबंद केल्यानंतर आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

धुळे शहरातील ऐंशी फुटीरोड, तिरंगा चौक, मौलवीगंज, चाळीसगाव रोड, देवूपर, नुरानी मशीद परिसरात उन्हात रांगा दिसल्या. काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळ उडाला होता. स्वामी ठेऊराम हायस्कूलच्या केंद्रावर भाजप कार्यकर्ते बूथजवळ प्रचार करताना आढळले. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रणजितराजे भोसले यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली. हिंदू एकता चौकातील गल्ली क्र. पाचमध्ये बोगस मतदानाची अफवा पसरली होती. मात्र, कोणीतरी मतदान केंद्रात मोबाइलवर फोटो काढल्याने गोंधळ झाल्याचे स्पष्ट झाले.

धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलाण विधानसभा मतदारसंघात अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. उत्राणे येथील मतदान केंद्रातील मतदान यंत्र काही काळ बंद पडल्याने मतदान थांबविण्यात आले. मात्र, तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांनी दुपारी बागलाण तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या. सटाणा शहरासह तालुक्यात मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा दिसून आल्या. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या कुटुंबीयांसह सकाळी लाडुद या गावी मतदान केले. धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह दिसून आला. तर त्या तुलनेत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मात्र मतदारांना उत्साहात मतदान केले. उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. बाह्य मतदारसंघाच्या तुलनेत मुस्लिमबहुल मध्य मतदारसंघात मतदारांचा उत्साह अधिक पाहायला मिळाला. सायंकाळी उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा कायम होत्या.

शहरात अधिक उत्साह

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मतदारांचा उत्साह अधिक पाहायला मिळाला. डॉ. भामरे व डॉ. बच्छाव यांनी विविध गावांना भेटी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.