मोठी बातमी.. PFI सह ‘या’ संघटनांवर केंद्राने घातली बंदी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका पीएफआय संघटनेवर तपास यंत्रणांनी ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली.

केंद्र सरकारने PFI संघटनेवर 5 वर्षांची बंदी घातली आहे. PFI सह काही संघटनांनाही केंद्र सरकारने बेकायदेशीर ठरवले आहे. यामध्ये सीएफआय, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, रिहॅब इंडिया फाऊंडेशन, नॅशनल वुमन फ्रंट यासारख्या संबंधित संघटनांचा सामावेश आहे. दरम्यान, देशविरोधी कृत्य केल्याच्या आरोपावरून देशातील 6 राज्यातून मंगळवारी 80 हुन अधिक PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांना NIA ने ताब्यात घेतले होते.

केंद्र सरकारने पीएफआय आणि इतर संघटनांवर बंदी घालताना काही कारणे देत बंदी घातली आहे. काय आहे अध्यादेशात..

PFI सह इतर संघटनांवर बंदी घालण्याची  कारणे

– पीएफआयने युवक, विद्यार्थी, महिला, इमाम, वकील आदी विविध घटकांमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी विविध संस्था, संघटना स्थापना केली. त्याचा उद्देश्य सभासद संख्या वाढवणे, त्यातून प्रभाव आणि निधी स्रोत वाढवणे हा होता.

– पीएफआय आणि त्याच्या भ्रातृभावी संघटना या सामाजिक-आर्थिक आणि राजकीय संघटना म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आपल्या छुप्या अजेंड्यानुसार समाजातील एका वर्गाला कट्टरतावादाकडे वळवून लोकशाहीला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करत होते. देशाच्या संविधानाबद्दल या संघटनेचा अनादर दिसत आहे.

– पीएफआयचे संस्थापक सदस्य हे स्टुंडट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या संघटनेचे नेते होते. त्याशिवाय, जमात-उल-मुजाहिद्दीन (JMB) या संघटनेसोबतही पीएफआयचा संबंध दिसून येतो. या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे.

– पीएफआयचे आयसिसशी संबंध असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या संबंधांचे काही उदाहरणे आहेत.

– PFI आणि त्यांच्याशी संबंधित भ्रातृभावी संघटनांकडून देशात असुरक्षा निर्माण झाल्याची भावना निर्माण करून एका समुदायाला कट्ट्ररतावादाकडे ओढण्याचे काम करत आहेत. त्यांचे काही सदस्य आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी निगडीत असल्याचे दिसून आले आहे.

– या कारणांमुळे केंद्र सरकारला युएपीए कायद्यातील कलम 3 मधील पोटकलम क्रमांक 1 नुसार कारवाई करणे आवश्यक वाटते.

– पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांवर बंदी घातली नाही तर, त्यांच्याकडून हिंसाचार घडवला जाऊ शकतो. देशातील एका वर्गात देशाविरोधात भावना निर्माण करून देशाची अखंडता, संप्रभुता आणि सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी कृत्ये करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.