पारोळा;- उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने मागून धडक दिल्याने ५५ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथील किसान कॉलेज समोर २७ रोजी रात्री घडली. शहरातील महामार्गावरील किसान कॉलेज समोर अज्ञात चालकाने २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अशोक लेलैंड कंपनीचे डंपर (एमएच २०, एलबी ३१७१) हे रस्त्यावरच उभे करून ठेवले होते.
या वेळी पळासखंडा सीम येथील पृथ्वीराज पाटील (वय ५५) हे बाजारानिमित्त पारोळा येथे दुचाकीने येत होते. त्यांच्या दुचाकीने डंपरला मागून जबर धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पारोळा कुटीररुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान पृथ्वीराज पाटील यांचा मृत्यू झाला. तर योजनाबाई पृथ्वीराज पाटील या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पारोळा पोलीस करत आहेत.