वृत्तपत्र उद्योग संकटात ! युद्ध आणि कोरोनामुळे कागदाची तीव्र दरवाढ आणि टंचाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. कोरोना महामारी आणि सध्या सुरु असलेले रशिया – युक्रेन यांच्यातील युद्धामुळे (Russia-Ukraine war) अनेक गोष्टी प्रचंड प्रमाणात महागल्या आहेत. या युद्धाचा परिणाम सर्वच जागतिक बाजारपेठेवर होतोय. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडर, इंधन, कच्चे तेल यासह कागदाच्या किंमती तर वाढल्या त्यासोबतच कागदाची टंचाई देखील वाढली. याचा मोठा परिणाम वृत्तपत्र उद्योगावर (Newspaper industry) होतांना दिसतोय.

कागदाची परदेशातून आयात

वृत्तपत्र उद्योगाला लागणाऱ्या कागदांपैकी 55 टक्क्यांपेक्षा जास्त कागद हा परदेशातून आयात करावा लागतो. त्यातच निम्म्यापेक्षा अधिक कागद हा रशियातून आयात केला जातो. रशिया हा भारताला सर्वाधिक वृत्तपत्र कागद पुरवठा करणारा देश आहे. तर अमेरिका, कॅनडा, रशिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, चीन या देशांतून भारतात वृत्तपत्र कागद आयात केला जातो. दरम्यान काही वर्षांपूर्वीच चीनने वृत्तपत्र कागद उत्पादन बंदच केले आहे. तसेच इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियामध्ये वृत्तपत्रासाठी लागणाऱ्या कागदाच्या मिल पडल्या आहेत.

जगभरात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे कोट्यवधी उद्योगधंद्याबरोबर वृत्तपत्र कागद उद्योगावरही संकट कोसळून वृत्तपत्र कागद निर्मिती आणि पुरवठा विस्कळीत झाला. याची सर्वात जास्त झळ भारताला बसून वृत्तपत्र कागदांच्या किमती वधारला.

रशिया- युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम

कोरोना महामारीतून जग सावरत नाही तोच एक नवीन संकट येवून पडले ते म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध. या युद्धामुळे सर्वच जागतिक बाजारपेठेवर परिणाम होवून महागाई वाढली. दरम्यान रशियाने युद्ध थांबवावे म्हणून अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध घातले आहेत. यामुळे रशियातून होणार्‍या निर्यातीला परिणाम होवून रशियाचे इतर देशांशी संपर्क साधणारे सागरी व इतर मार्गही बंद झाले आहेत. यामुळे जहाज कंपन्या, कंटेनर व्यावसायिक माल वाहतुक करायला नकार देत आहेत. अशी कठीण परिस्थिती उध्दभवल्याने मोठी टंचाई निर्माण होवून महागाईने बाजी मारली. कच्च्या मालाच्या टंचाईची परिस्थिती परदेशात निर्माण झाल्याने भारतीय कागद कंपन्यांनी क्राफ्ट पेपर, पॅकिंग पेपर निर्मिती करण्यावर आता जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

दरवाढीने शिखर गाठला

या टंचाईमुळे वृत्तपत्र कागदाच्या दरवाढीने शिखर गाठला आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी कागदाचा दर 40 हजार ते 45 हजार मेट्रिक टन होता. तो दर आता टनामागे 80 हजार रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. वृत्तपत्रासाठी लागणाऱ्या कागदाचा 400 किलोचा एक रोल असतो. गेल्या वर्षभरापासून हा दर 45 रुपये प्रतिकिलो पासून 70 वर पोहचला. तसेच शाई, रसायने, पार्सल वाहतूक यांच्यात देखील प्रचंड दरवाढ झाली. यामुळे वृत्तपत्र उद्योग आता संकटात सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच कागद टंचाई आणि दरवाढ होत राहिली तर वृत्तपत्र रोज प्रकाशित करणेही जड जाणार आहे. तसेच वृत्तपत्राची पानेही कमी करावी लागतील आणि वृत्तपत्राच्या किमतीही वाढवाव्या लागतील, तेव्हाच वृत्तपत्र उद्योग तग धरू शकेल.

महाराष्ट्रात जीवघेण्या स्पर्धा

ही सर्व परिस्थिती जागतिक स्तरावरची असली तरी महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सध्या महाराष्ट्रात वृत्तपत्र उद्योगांमध्ये जीवघेण्या स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. यामुळे मोठी वृत्तपत्रे वाचकांना कमी दरात वृत्तपत्र देऊन संपूर्ण व्यवसायच अडचणीत आणत आहेत. जगातील सर्व देशांत वृत्तपत्राच्या किमती या कागदाच्या किमतीवर अवलंबून असतात. त्यामुळे अगदी पाकिस्तान, श्रीलंका अशा आशियाई देशांत देखील वृत्तपत्राच्या किमती किमान 10 रु. ते 20 रु.पर्यंत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतातील इतर राज्यांत देखील 6, 8, 10 रु. अशा झालेल्या आहेत.

परदेशी वृत्तपत्रांच्या किमती

कागदाच्या दरवाढी आणि टंचाईमुळे भारतासह परदेशी वृत्तपत्रांच्या किमती देखील वाढल्या आहेत. तर परदेशातील वृत्तपत्रांच्या किमती भारतीय वृत्तपत्रांच्या किमतीच्या तुलनेत चौपट ते 50-60 पट आहेत. तसेच भारत आणि जगातील किंवा शेजारील राष्ट्रांतील आपल्यातील वृत्तपत्राच्या किमतीत प्रचंड फरक आहे.

अमेरिकेतील मातब्बर वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या रोजच्या अंकाची किंमत 3 डॉलर्स म्हणजे सुमारे 225 रु. आहे. अंकाची पानेही 80 ते 100 असतात. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ प्रमुख वृत्तपत्राच्या अंकाची किंमत 2 डॉलर्स ते 3.5 डॉलर्स म्हणजे 150 रु. ते सुमारे 265 रु. एवढी असते. ‘पोस्ट’च्या डिजिटल आवृत्तीची मासिक वर्गणी सुमारे 6 डॉलर्स म्हणजे 450 रु. आहे. म्हणजे एका डिजिटल अंकाची किंमत होते 15 रुपये आहे. पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राची किंमत 25 रु. आणि ‘जंग’ची किंमत 15 रु. आहे. ‘सिलोन टाइम्स’ची किंमत 80 रु. आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.