पाळधीतील समाजकंटकांचा बंदोबस्त करा

0

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाळधी (Paladhi) या गावी मंगळवारी दंगल झाली. मुंबई नागपूर महामार्गावर असलेले पाळधी हे गाव पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे जन्मगाव होय. पालकमंत्री हे पाळधीतच राहतात. दोन्ही पाळधी गावांची लोकसंख्या २५ हजार इतकी येते. सर्व समाजाचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. महामार्गाची वाहतूक आतापर्यंत पाळधी गावातूनच जात होती. आता पाळधी गावाबाहेरून बायपास केलेला आहे. मंगळवार दिनांक २८ मार्च रोजी संध्याकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास जळगावहून सप्तशृंगी गडावर पायी यात्रा जात होती. यात्रेचा मुक्काम पाळधीच्या साई मंदिरात होता. त्यानंतर यात्रा पुढे जाणार होती. दरम्यान ही यात्रा पायी पाळधीत प्रवेश करून साठगर मोहल्ला येथून जात असताना काहींचे म्हणणे आहे की, प्रार्थना स्थळा जवळून जात असताना पायी यात्रेतील डीजे वाजवला जात होता. तर काहींचे म्हणणे आहे की डीजे बंद होता. परंतु प्रार्थना स्थळावरून यात्रा पुढे सरकताच मागून यांच्यावर दगडफेक सुरू झाली. यात काही यात्रेकरू जखमी झाले. यात्रेच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही दगडाचा मार बसला. यामुळे यात्रेकरूंनी थेट पाळधी पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार करून हकीकत सांगितली

दरम्यान वाद मिटण्याऐवजी दोन गटात तो वाढतच गेला. दोन्ही बाजूंनी टारगट समाजकंटक तरुणांचा जमाव दगडफेक करीत होता. रस्त्यावर असलेल्या टपऱ्या, हातगाड्या उलटवून टाकण्यात आल्या. रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी दोन्ही गटाच्या जमावातील काही जणांना अटक करून गुन्हे दाखल केले. तेव्हा समाजकंटक पांगले परंतु रात्रभर भीतीदायक वातावरण या परिसरात होते. आणखी काही दुर्घटना होऊ नये म्हणून पाळधी गावात तीन दिवसांचा कर्फ्यू जारी करण्यात आला. बुधवार, गुरुवार दोन्ही दिवस कर्फ्यू असल्याने सर्वत्र शांतता होती. दोन्ही दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली. शुक्रवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 11 पर्यंत कर्फ्यू जारी केला असला तरी शुक्रवारी पाळधी गावाचा आठवडे बाजार असल्याने बहुतेक कर्फ्यू उठवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात येईल. आता परिस्थिती आटोक्यात असली तरी आतून सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारचा आठवडे बाजार सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा. कारण आठवडे बाजारावर कित्येक व्यवसाय अवलंबून असतात.

पाळधी या पालकमंत्र्यांच्या गावात झालेल्या दंगलीने गालबोट लागले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही नामुष्कीची बाब म्हणावी लागेल. तथापि समाजकंटकांना कसलीही जात नसते, धर्म नसतो. मग ते कोणत्याही जाती-धर्माचे म्हणून घेत असतील, परंतु समाजकंटक ते समाजकंटकच. शांततेचा भंग करून अशांतता पसरविणे हा एकमेव उद्देश त्यांचा असतो. अशा समाजकंटकांना वेचून काढून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी. पाळधी गावातच साठगर मोहल्यात (Sathgar Mohalla) यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. पोलीस प्रशासन असताना कालच्या दंगलीच्या आधी पोलीस प्रशासन सर्वत्र असायला हवे होते. त्याचबरोबर साठगर मोहल्ला परिसरात रस्त्यावर रात्रीच्या वेळी डिव्हायडरवर बसलेल्या टारगटांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कोणाची? त्यांच्या यापूर्वीच बंदोबस्त केला असता तर ही घटना घडली नसती. या टारगट टोळक्यांना पोलीस घाबरतात काय? किंवा पोलीस प्रशासनातर्फे बघायची भूमिका घेण्याचे कारण काय? प्रार्थना स्थळा जवळून यात्रा जात असताना डीजेचा आवाज बंद केला होता की नाही? याची योग्य ती चौकशी व्हावी. म्हणजे दोन्ही बाजूच्या गटावर त्याचा दबाव येईल तसेच पाळधी या पंचवीस हजार लोकसंख्येच्या गावातील समाजकंटकांची यादी पोलिसांजवळ असेलच. त्यानुसार त्यांचे वर कडक कारवाई केली तर ते पुन्हा डोके वर काढून शकणार नाहीत. पोलिसांनी गुन्हे दाखल करून ५६ जणांना अटक केलीच आहे. अटकेची यादी अजून वाढू शकते. कसलीही भेदभाव न ठेवता निपक्षपातीपणे समाजकंटकांवर कारवाई करावी.

साठगर मोहल्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक, कार, दुचाकी ज्या उभ्या राहतात त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा अडथळा होतो. हे वाहनांचे अतिक्रमण येथे होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. ती घेतली जात नाही. पाळधीतील या दंगलीमुळे पालकमंत्र्यांच्या गावात दंगल झाली म्हणून गालबोट लागल्या आहे. या दंगलीची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे या दंगली बाबत अद्याप मौन पाळलेले दिसून आले. परंतु पाळधी गावात शांतता प्रस्थापित होण्यासाठी तसेच कायद्यावरील कायमस्वरूपी शांतता राहील याबाबत गुलाबराव पाटलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.