स्कूल बसचा भीषण अपघात, विद्यार्थी आणि शिक्षक जखमी

0

लोकशाही ऑनलाईन डेस्क

पहूर | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील पहूर पासून शेंदुर्णीच्या दरम्यान आज 31 मार्च रोजी सकाळी स्कूल बस उलटून झालेल्या अपघातात विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत.

या संदर्भात उपलब्ध झालेली माहिती अशी की, पहाटे सुमारे सात साडेसात वाजेच्या दरम्यान सरस्वती विद्या मंदिर या शाळेची क्रमांक दोनची बस उलटली. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबा जवळ हा अपघात झाला. या बसमध्ये अंदाजित ४० विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे ३० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि काही शिक्षक जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी गर्दी 
अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. या अपघातात जखमी झालेले सर्वांना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला ? स्कूल बस नेमकी कशी उलटली ? ड्रायव्हरचा बस वरील ताबा कसा सुटला याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. तथापि, अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भिती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या अपघाताची माहिती घेण्याचे कार्य करीत आहेत. तर, अपघातामध्ये जखमी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.