धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेशच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेश येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असुन, प्रथमदर्शनी मयताची ओळख पटविणे अवघड असल्याने अखेर ३० जुलै रोजी मयताची ओळख पटली. मयत इसम हा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा ते गाळण दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३६५ / २१ नजीक एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती रेल्वे क्रं. १८०२९ चे लोकोपायलट आर. एस. कोष्टी यांनी वाॅकी टाॅकी द्वारे पाचोरा स्टेशन प्रबंधक यांना दिली. घटनास्थळ हे पाचोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने स्टेशन प्रबंधक यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला माहिती कळविली असता, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल निवृत्ती मोरे, पोलिस नाईक सचिन निकम हे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक यांनी मृतदेहाची चौकशी केली असता मृत व्यक्ती जवळ पाकीट सापडले. पाकिटात एक लकी ड्रॉ कुपन आढळुन आले. पो. ना. यांनी सुर्यकांत नाईक त्या कुपनच्या आधारे भ्रमणध्वनीवरुन छडा लावत मृत व्यक्तीचे नाव मुराली राजकुमार मौर्य (वय – २८) रा. हेतमपुर पो. हेतमपुर, ता. सकडिया, थाना धानापुर, जि. चंदौली (उत्तर प्रदेश) असे निष्पन्न झाले आहे. मयत मुराली मौर्य हे दि. २६ जुलै रोजी वाराणसी कॅन्ट येथुन मुंबई येथे कामासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांनी दिली. तपासी अंमलदार सुर्यकांत नाईक यांनी सविस्तर माहिती नोंदवत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.