ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय महिलांची यशोगाथा

0

लोकशाही विशेष लेख

 

पी. व्ही. सिंधू (P. V. Sindu) यांचा जन्म ५ जुलै १९९५ साली हैदराबाद (Hyderabad) येथे झाला. त्यांचे वडील पी. व्ही. रामण्णा व आई पी. विजया या राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू होते. त्यांचे पूर्ण नाव पुर्सला व्यंकट सिंधू असे आहे. त्या एक ‘चाईल्ड प्रॉटेजी’ आहेत, म्हणजेच असे मुल जे दहा वर्षे वयाच्या आतच एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रौढ व्यक्तीप्रमाणे कार्य करू शकते. महेबूब अली (Mahbub Ali) हे त्यांचे पहिले प्रशिक्षक होते. हैदराबादच्या गच्चीबावली संकुलात पुलेला गोपीचंद यांचे प्रशिक्षण वर्ग आहेत. तेथे त्यांनी प्रवेश घेतला मात्र त्यांचे घर आणि संकुल यातील अंतर खूप जास्त होते, अशा वेळी गोपीचंद यांनी त्यांच्या वडिलांना संकुलाजवळ घर घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्यांनी मानला आणि हाच निर्णय त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.

पालकांकडून अनुवंशिक मिळालेली ५ फुट ११ इंच उंची आणि प्रशिक्षक गोपीचंद यांनी घेतलेली अपार मेहेनत याची फळे लवकरच दिसून येऊ लागली. २०१३, २०१४ व २०१५ अशी सलग तीन वर्षे त्यांनी मकाऊ स्पर्धेचे (Macau Competition) अजिंक्यपद जिंकले. तसेच कोरिया सुपर सिरीज जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांच्या या सर्व क्रीडा कारकिर्दीचे सर्वोच्च शिखर होते २०१६ चे रिओ ऑलिम्पिक (Rio Olympics). या स्पर्धेत अंतिम फेरीत फेरी गाठणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय ठरल्या आणि त्यांनी भारताला बॅडमिंटन क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकचे पहिले रौप्य पदक (Silver Medal) येथेच जिंकून दिले. त्यानंतर लगेचच पुढच्या २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) त्यांनी कांस्य पदक जिंकून पुन्हा एकदा भारताची शान वाढवली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, सिंधू यांना २०१३ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), २०१५ मध्ये पद्मश्री (Padmashri), २०१६५ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) आणि २०२० मध्ये पद्मभूषणने (Padma Bhushan) सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी
संपर्क : ७५८८९३१९१२
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.