जिल्हा बँक चेअरमनची राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांकडून कोंडी

0

लोकशाही, संपादकीय लेख

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक संजय पवार (Sanjay Pawar) यांनी बंडखोरी करून विरोधकांच्या सहकार्याने चेअरमन पद पटकावले. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडबड उडाली. महाविकास आघाडीचे बँकेत बहुमत असताना राष्ट्रवादीचे चेअरमन पदाचे अधिकृत उमेदवार ॲड रवींद्र पाटील (Adv Ravindra Patil) हे एक मताने पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress) ही जिव्हारी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व संचालकांनी कालच्या बँकेच्या बैठकीला गैरहजर राहून त्यांची मनातली खदखद दाखवून दिली. त्यामुळे संजय पवार यांच्या चेअरमनपदा अंतर्गत झालेली पहिलीच बँकेच्या संचालक मंडळाची सभा कोरम अभावी तहकूफ झाली. कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकरी हिताचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार होते. परंतु राष्ट्रवादीचे संचालक बैठकीला हजर राहिले नाहीत, म्हणून गैरहजर राहणारे संचालक शेतकरी हिताच्या विरोधात आहेत, असा टोला चेअरमन संजय पवार यांनी मारला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या संचालकांनी राष्ट्रवादीच्या संचालकांना फोन करून बैठकीला गैरहजर राहण्याबाबत सूचना दिल्याचे मला कळले, असेही संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते दोन मोठे संचालक कोण? यांची नावे सांगण्यास मात्र पवारांनी नकार दिला. बैठकीला फक्त २१ पैकी सहा संचालक उपस्थित होते, असे कळते. त्यामुळे आता ही बैठक येत्या १५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

१५ तारखेला सभा सुद्धा करम अभावी तहकूब झाली तर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे संजय पवार यांनी सांगितले. ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने काही महत्त्वाचे निर्णय बँकेला घ्यायचे होते. तथापि कोरम अभावी सभा तहकूब झाली. चेअरमन संजय पवार एका मताधिक्याने चेअरमन बनले असले तरी पहिल्याच सभेत ते अल्पमतात असल्याचे स्पष्ट दिसून आले. चेअरमन संजय पवार यांच्या अडचणीत वाढ करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी संचालकांकडून होईल. बँकेचे चेअरमन संजय पवार यापुढे कशाप्रकारे आपली भूमिका वठवतात, त्यात त्यांचा कस पणाला लागणार आहे, एवढे मात्र निश्चित. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे; आणि ते आशीर्वाद मरेपर्यंत मला मिळणार, असे संजय पवार यांनी सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझ्या पाठीशी असल्याचे स्पष्ट करून, मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे, असे स्पष्ट करून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जणू धक्का दिला आहे. परंतु चेअरमन संजय पवार यांनी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा नाराजी ओढवून घेत आहेत, ही बाब त्यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे.

सहकारात राजकारण करू नये, असे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगतात. त्यामुळे पक्षाशी बंडखोरी केल्याचे संजय पवार यांनी पहिल्यांदा जाहीर केले. संजय पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांकडून सहकार्य मिळत नाही, तोवर ते गप्प बसणारे नाहीत. कारण शिंदे फडणवीस सरकारमधील दोन बडे मंत्री विशेषता भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे संजय पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. गिरीश महाजन यांना जिल्हा बँक निवडणुकीचा बदला घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना धक्का देण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. कारण जिल्हा महाविकास आघाडीने आघाडीचे बहुमत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांना ऐनवेळी चेअरमन पदी उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत उमेदवार ॲड रवींद्र पाटील यांचा पराभव झाला. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या मंत्री महोदयांची खेळी यशस्वी ठरली. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना चेअरमन पदासाठी संजय पवार विरोधकाचे उमेदवार राहतील, याबाबत ते पूर्णपणे गाफील राहिले. ॲड रवींद्र पाटील यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे उमेदवार फुटले असे, आरोप केला. तथापि काँग्रेसचे उमेदवार ॲड रवींद्र पाटलांनाच मतदान केले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांनी स्पष्ट केले. परंतु जिल्हा बँक चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक फुटल्याचे बोलले गेले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झाली, एवढे मात्र निश्चित. चेअरमन संजय पवार यांनी चेअरमन ऍड रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) या भाजपच्या असताना सुद्धा त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस संचालकांनी त्यांना सहकार्य केले. इतकेच नव्हे तर बैठकीला कोरम पूर्ण झाले नसतानाही घरी जाऊन संचालकांच्या सह्या घेऊन कोरम पूर्ण केल्याचा गौप्यस्पोट केला. त्यांच्या या गौप्यस्पोटाकडे कशा पद्धतीने पाहिले जाते, हे बघणे आवश्यक ठरेल. त्यामुळे मागच्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत कसा कारभार झाला याचा भांडाफोड करण्यास संजय पवार मागेपुढे पाहणार नाही. ते त्यांचे अस्त्र वापरतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस संचालक यापुढील काळात कोणती भूमिका घेतात याकडे, सर्वांचे लक्ष लागणार आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांवर शेतकरी हिताचे नसल्याचा आरोप संजय पवार यांनी करून आपला रोष व्यक्त केला आहे. येत्या १५ तारखेला बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस संचालक कोणती रणनीती वापरतात याकडे लक्ष लागले आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.