नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करावी -कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

0

जळगाव ;– शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवीस्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक आणि प्राध्यापक यांनी सज्ज रहावे व पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व शैक्षणिक घटकांपर्यंत या धोरणाबाबत जनजागृती करावी असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी विद्यापीठात व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, संस्थाचालक, प्राचार्य आणि नोडल ऑफिसर यांच्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रा. माहेश्वरी बोलत होते. पदवीस्तरावर राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत पॉवर पाँईंट प्रेझेंटेशन द्वारे प्रा. माहेश्वरी यांनी दिड तास माहिती दिली. हे धोरण राबवितांना संस्थाचालक आणि प्राचार्य यांना अधिक पुढाकार घ्यावा लागणार आहे त्यासाठी आपल्या परिसरातील उद्योग, संस्था, बँका, सहकारी संस्था आदींसोबत सामंजस्य करार करावे लागतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळेल असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा राहणार आहे. प्रवेश घेतल्यानंतर जरी विद्यार्थ्याने शिक्षण अर्धवट सोडले तरी प्रवेशाच्या वर्षापासून सात वर्षांच्या आत तो पुन्हा उर्वरित शिक्षण पूर्ण करू शकतो. चार वर्षाच्या या पदवी अभ्यासक्रमात एक वर्षानंतर विद्यार्थ्यांला पदवी प्रमाणपत्र, दोन वर्षानंतर पदविका, तीन वर्षा नंतर पदवी आणि चार वर्षानंतर पदवी ऑनर्स ही पदवी पाप्त होणार आहे. चार वर्षांनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला अथवा पीएच.डी.ला विद्यार्थ्यांला पवेश मिळू शकतो. एका वर्षात विद्यार्थ्यांला ४० क्रेडीट पूर्ण करावयाचे आहेत. चार वर्षांचे १६०ते १७६ क्रेडीट राहणार आहेत. मेजर आणि मायनर विषय कसे राहतील याबद्दलची माहिती कुलगुरूंनी दिली. विद्यार्थी महाविद्यालयाकडे कसा आकर्षित होईल, तो वर्गात कसा टिकून राहील आणि त्याला प्राप्त पदवीच्या आधारावर रोजगार कसा मिळेल. हे मुद्दे महत्वाचे असल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले.

प्रारंभी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत व प्रा. अनिल डोंगरे यांनी विद्यापीठाने केलेल्या तयारीची माहिती दिली. उपस्थितांच्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.