विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा केंद्रांना भेटी देऊन घेतला आढावा

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा केंद्रांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वतंत्रपणे भेटी देवून परीक्षांचा आढावा घेतला. विद्यापीठाने केलेल्या जनजागृतीचा परिणाम दिसत असून यावर्षी परीक्षांमधील कॉप्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून येत आहे.

विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबरच्या परीक्षा दिवाळीच्या आधी सुरु झाल्या आहेत. विद्यापीठाने यावर्षी तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा घेतल्या जाव्यात यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करून जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) कॉपी केल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होवू शकते याची माहिती दिल्यामुळे या सत्रात कॉपी करण्याचे प्रमाण घटले आहे.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी बुधवारी जामनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी येथील गरूड महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयात सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे होते. गुरुवारी साक्री येथी सी.गो. पाटील महाविद्यालयाला देखील कुलगुरूंनी भेट दिली. विद्यापीठाने झालेल्या परीक्षांचे तातडीने ऑनलाईन मुल्यांकन सुरु केले असून कुलगुरूंनी भेटी दिलेल्या महाविद्यालयात मुल्यांकन केंद्रालाही भेट देवून माहिती घेतली. सर्व प्राध्यापकांनी या मुल्यांकन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी केले आहे.

प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे एरंडोल येथील डी.एस. पाटील महाविद्यालय, धुळे येथील झेङ बी. पाटील महाविद्यालय, एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय आणि पालेशा महाविद्यालयाला भेटी देवून परीक्षांचा आढावा घेतला. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षणमंडळाचे महाविद्यालय, पंकज कला महाविद्यालय व सामाजिक कार्य महाविद्यालय, शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालय, आर.सी. पटेल महाविद्यालय, एच.आर.पटेल महिला महाविद्यालय तसेच नरडाणा येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय व थाळनेर येथील महाविद्यालयात सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.