परीक्षा निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून विद्यापीठांमध्ये अग्रस्थान – प्रा. एस.टी. इंगळे

0

जळगाव;- विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच परीक्षा निकालातील त्रुटी देखील कमी केल्या आहेत, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी परीक्षा विभागाची कार्यपध्दती आणि तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा या विषयांवर आयोजित कार्यशाळेत बोलतांना केले. ही कार्यशाळा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक मंगळवारी विद्यापीठात घेण्यात आली.

परीक्षा विभागाची कार्यपध्दती सर्व संबधित घटकांना माहिती व्हावी तसेच कॉपीचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दि.१७ ऑक्टोबर रोजी अधिसभा सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीस प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रा.योगेश पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, माजी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले.

प्र-कुलगुरू प्रा. इंगळे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, परीक्षा निकालासंदर्भात विद्यापीठात प्राप्त होण्यापुर्वी त्या महाविद्यालय स्तरावर सोडविल्या जाव्यात. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज पडू नये त्यासाठी या कार्यशाळेतून मिळालेली माहिती विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात तासिकांना नियमित उपस्थिती द्यावी. जेणेकरून त्यांना कॉपी करण्याची गरज भासणार नाही यासाठी विद्यापीठाच्या अभियानाला संघटनांनाी व सर्व घटकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रा.योगेश पाटील यांनी परीक्षेशी निगडीत अध्यादेशाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी पोस्टर, पथनाट्य याव्दारे जनजागृती करावी. तसेच विद्यापीठातील परीक्षा विभागात एक खिडकी योजना लवकरच सुरु करण्यात येईल ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करता येवू शकेल. कॉपी केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच विद्यापीठाचा विद्यार्थी गुणवत्तापुर्ण व पदवीप्राप्त केलेला आसावा ज्यायोगे त्यास भविष्यातील करीअरमध्ये बाधा येणार नाही. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षांसाठी विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा.दीपक दलाल यांनी केले. प्रास्ताविक‍ कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ अमोल पाटील व प्रा. सुरेखा पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीत विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी विधी शाखेचा पॅटर्न सुधारित करावा, प्राध्यापकांनी आदर्श उत्तर पत्रिका कशी लिहावी याचे मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांचा तक्रारींचा निपटारा त्वरीत व्हावा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात यासारख्या विविध मागण्या केल्या.

विद्यार्थी संघटनांच्या प्रश्नांची उत्तरे प्र-कुलगुरू, कुलसचिव, प्राचार्य व संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी दिली. या बैठकीत व्य. प. सदस्य प्राचार्य शिवाजी पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.व्ही.वाय.बहिरम, प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार, अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ.किशोर बी. पाटील, प्रा. इ.जी. नेहते, डॉ. मंदा गावीत, स्वप्नाली महाजन, डॉ. विशाल पराते, नितेश चौधरी, श्रीमती सुरेखा पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम, अमोल सोनवणे, डॉ. गजानन पाटील, डॉ. राजेश जवळेकर, डॉ. एस.डी. बऱ्हाटे, प्राचार्य डॉ. गिरीष पटनाईक, भुषण भदाणे, डॉ. कमलाकर इंगळे, रतन महाजन, प्रसाद भापकर, अजय सपकाळ, रा.का. पवार, मोहित देसाई, कुणाल पवार, व्ही.टी. जोशी, योगेश चंद्रकांत पाटील, नागेश गलांडे, सागर बारी, वैभवी धिवरे व परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मुनाफ शेख यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्यासह के.एन.गिरी, वसंत वळवी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.