शरद पवार UPA चे अध्यक्षपद सांभाळणार ?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्यात यावं असा प्रस्ताव दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत एकमताने संमत करण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवार हे युपीएचं अध्यक्षपद सांभाळणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

२०१४ नंतर २०१९ च्या निवडणुकीतही काँग्रेसचा पराभव झाला. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा मोठा पराभव झाला. यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या तिघांनीही राजीनामा देऊन नवा अध्यक्ष नेमला जावा असा प्रस्ताव मांडला.

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. युपीएच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी काम पाहात आहेत. आता मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत शरद पवार यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद दिलं जावं हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. दिल्लीत झालेल्या बैठकीत शरद पवारही उपस्थित होते.

काय आहे या प्रस्तावात ?

‘देशातली सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) नेतृत्व करायला हवं. शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातले अत्यंत अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. विरोधी पक्ष बळकट आणि सक्षम करायचा असेल तर शरद पवारांकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली पाहिजेत’ असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या आणि युपीएचे घटकपक्ष असलेल्या इतर पक्षांच्या भूमिका काय असतील. या पक्षांची भूमिकाच स्पष्ट करू शकणार आहे की शरद पवार युपीएचे अध्यक्ष होणार की नाही. याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.