घरफोडी करून लाखोंचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील नवीपेठ येथे लोखंडी खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी अंदाजे १५ ते २० लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शहरातील नवीपेठ परिसरातील पत्र्या हनुमान मंदिरसमोर असलेल्या बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल (वय ५२) हे आपल्या कुटुंबासह राहतात. ते मोबाईल रिपेअरिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. दि.२४ मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. त्यापूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते.

राजू अग्रवाल यांच्या घरात चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत लोखंडी खिडकीचे गज वाकवून काचेची खिडकी फोडत घरात प्रवेश केला. कपाट फोडत चोरट्यांनी मंगळसूत्र, नेकलेस, मोतीहार, बारा कानातले, सोन्याचे तुकडे, २ अंगठी, ३ सोन्याचे शिक्के, चैन असा जवळपास २५ ते ३० तोळे दागिने आणि देव्हाऱ्यात ठेवलेले ८ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला.

दरम्यान बुधवारी अग्रवाल कुटुंबीय घरी आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक जगदीश मोरे, सर्जेराव क्षीरसागर, कर्मचारी योगेश बोरसे, योगेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, अक्रम शेख, संजय हिवरकर, मोरे यांच्यासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, अविनाश देवरे आदी पोहचले आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ यांनी पाहणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.