लोकशाही न्यूज नेटवर्क
सांगली : कोणत्याही कार्यक्रमाला मला यायला नेहमीच उशीर होतो. आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ असले, तरी माझे व घड्याळाचे कधीच जमले नाही, असे मत जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी त्यांनी अनेकांना चिमटेही काढले. जयंत पाटील हे उशिरा येण्याच्या त्यांच्या सवयीबद्दल बोलत असतानाच, त्यांना मध्येच थांबवत आमदार अनिल बाबर म्हणाले, चिन्हाचे नाव घेऊ नका, उगीच प्रचार होईल. त्यावर जयंत पाटील म्हणाले, आता तर हात व धनुष्यबाणाच्या नादाला लागून घड्याळ्याची वेळ चुकू लागली आहे. यावर सभागृहात एकच हशा पिकला. लगेच स्वत:ला सावरत जयंतरावांनी हा विनोदाचा भाग आहे, असे स्पष्ट केले.
मंत्र्यांनी जिल्हा बँकेत संचालक होणे चुकीचे
जयंत पाटील म्हणाले, काही जिल्हा बँकांमध्ये आता मंत्रीही संचालक मंडळात वर्णी लावून घेत आहेत, ही गोष्ट चुकीची आहे. मंत्र्यांनी स्वत:ची वर्णी न लावता, आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे.