भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख
समर्थ रामदास स्वामी यांनी ‘दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात ‘अर्चन भक्ती’ ही भक्तीची पाचवी पायरी सांगितली आहे. पाचवी भक्ती ती अर्चन म्हणजे ‘देवतार्चन’. शास्त्रोक्त पुजा विधान केले पाहिजे. याहि वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रमे हे त्यांनी निक्षुन प्रतिपादले आहे. देवीच्या या नवरात्रात या अर्चन भक्तीचा परमोच्च बिंदू सहजच गाठला जातो. मुख्य म्हणजे प्रत्येकाची रिती प्रमाणे घरात व सार्वजनिक ठिकाणी, मंदिरात देवी बसविली जाते. तिचे प्रतीक म्हणून त्यामूळे घटस्थापना केली जाते, प्रत्येक घराचे जणू मंदिर होते, नऊ दिवस देवीचे वास्तव्य त्या घरात असते त्यामुळे मंदिरापासून पूर्ण घराची स्वच्छता होते, पावित्र्य पूरेपूर जपले जाते.
देव्हाऱ्यातील देवीची मूर्ती असो, प्रतिमा असो, टाक असो त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. देवीसाठी लागणारी वस्त्रे, आसने उपकरणे, अंलकार, भूषणे ही सर्वांगाने पवित्र करून ठेवलेली असतात. देवीला अभिषेक करून पंचामृत स्नान, गंध, अक्षता वाहून सुगंधित पुष्पाची माळा घालून, धुप व दीप ओवाळून नैवेद्य रोज एक गोड पदार्थांचा किंवा पुरण पोळी, उपवास असेल तर उपावास पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवीला तांबुल विडाही दिला जातो. सुंदर सुंदर साज शृंगाराची लेणी करून वेणी, फणी, नथ, बांगड्या, माळ, तिला सजवले जाते. मुकुटापासून पैंजणापर्यंत नानाविध अलंकाराने ती सुशोभित केली जाते. छताला दिव्य अंबर लावले जाते.
चोहीकडे सुंदर फुलांच्या माळा सोडल्या जातात, एकूणच प्रत्यक्ष देवीची पूजा करता करता आपणच जणू काया-वाचा-मने तिच्याशी तद्रूप पावतो. काया म्हणजे देह तर छाया म्हणजे प्रतिमा असा भाव ठेवून जणू पुजा घडते आणि असाच भाव ठेवून पुजा घडायला देवीची मूर्ती ही केवळ धातूची राहत नाही तर ती चैतन्य रूप होऊन जाते व त्यातील चैतन्याचा अंश आपल्यालाही प्राप्त होतो. अशा अनन्य भावाने देवीचे पूजन केले किंवा मानसपूजन जरी केले तरी देवी प्रसन्न होते. आपला सप्रेम भाव तिला पोहचतो व ती प्रसन्न अंतः करणाने उपासकावर प्रसन्न होते. जगन्मातेचे हे स्वरूप पाहून मन अगदी मोहून जाते. पंचमीच्या दिवशी उपांगललिता, जागरण व्रत, अर्ध्य देऊन पाद्यपूजन भवानीचे होते. रात्रीच्या वेळी हरिकथा होते व जागरण होते. आनंदाला, प्रेमाला नुसते उधाण येते. या पाचव्या दिवशी भक्तीचा रंग अधिकच गहिरा होत गेलेला आढळतो.
“आता साजणी झाले मी निःसंग ।”
“विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग ।”
” काम क्रोध हे झोडियले मांग । “
“केला मोकळा मार्ग सुरंग ।”
“आईचा जोगवा जोगवा मागेन”
अशी पूजा घडता घडता आपला देह व देवीची प्रतिमा पूजा करता करता देहभाव नाहीसा झाला. जणू कोणताही संग किंवा मलिनता राहिलीच नाही. संत एकनाथ महाराजांनाही हाच अर्थ अभिप्रेत आहे. मनात कुठलेही संकल्प संसारिक उठत राहतात. ते सुद्धा आता नाहीत व वाईट विकल्प व विचार त्यांचाही समूळ नामशेष झाला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जणू सारे रिपू पळूनच गेले आहेत दाही दिशाला. आता आई जंगदेबेच्या दर्शनाच्या आड काहीही येणार नाही आहे. हे षड्रिपू खरं तर खुप बळकट असतात. पण या देवी अर्चनातून मी त्यांना सहज बाजूला घालवले आहेत व ज्ञानराज माऊली म्हणतात.
“तुझा देव्हारा मांडिला”
“चौक आसनी दिघला”
“वरी प्रेम चांदवा भरला”
“ज्ञानगादी दिली बैसावया.”
आज माझ्या हृदयस्थ आसनावर कुलस्वामिनी विराजमान होत आहे.
॥ उदे ग अंबे उदे II
IIउदे ग अंबे उदे ॥
भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269