राजगुरूनगर ;- मराठा समाजातील एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली. मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाज सुनील कावळे यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच दूर करणार नाही. तसंच कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आज मनोज जरांगे पाटील यांनी राजगुरुनगरच्या सभेत केला. एवढंच नाही तर आत्तापर्यंत मराठा बांधवांनी ज्या आत्महत्या केल्या त्याला सरकार जबाबदार असल्याचंही म्हटलं आहे.
“आपला एक भाऊ सुनील कावळे याने आत्महत्या केली. त्याचं मला वाईट वाटतं आहे. मात्र सुनील कावळे यांचं बलिदान वाया जाणार नाही. मराठा समाजाच्या वेदना मला सहन होत नाहीत. मी हार तुरे स्वीकारण्यसााठी नाही तर मराठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगाव फिरतो आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. मराठा बांधवांनी आत्महत्या करु नये असं आवाहन मी पुन्हा एकदा करतो आहे. तसंच आत्तापर्यंत ज्या आत्महत्या झाल्या त्यांना सरकार जबाबदार आहे.” असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.