नवाविध भक्ति व नवरात्र : विष्णो:स्मरण

0

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख

समर्थ रामदास स्वामींनी ’दासबोध या ग्रंथात चतुर्थ दशकात ’विष्णोस्मरण’ ही तिसरी पायरी वर्णिली आहे. श्रवण व किर्तन या दोन्ही बहिरंग साधना झाल्यावर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी की आपण अंतरग  साधना करायलाच हवी. आपले आपण संयमित व मर्यादशील व्हायला हवे म्हणजे श्रवणातून साधक जन्माला यायला हवा, समर्थ रामदासस्वामींनी नामाचे सुलभत्व सांगितले. इतर फार उपकरणांची इथे गरज नसते. सप्रेमाने नामस्मरण सर्वकाळ करावे.सुख-दुःख, उद्वेग – चिंता, अथवा आनंदरूप असता नामस्मरणाविण राहू नये. हर्षकाली, विषमकाळी, पर्वकाळी, विश्रांती काळी, निद्राकाळी नामस्मरण करावे.  बालपणी – तरुणपणी – वृद्धापकाळी व अंतःकाळी नामस्मरण करावे. सर्व जात, सर्व वर्ण, सर्वांनाच हा अधिकार आहे.

“नाम स्मरे निरंतर । ते जाणावे पुण्यशरीरI” 

“महादोषांचे गिरीवर । रामनामे नासती I” 

ही नामाची महती आहे.

आज तृतीयेचा दिवस आहे. जगदंबेच स्मरण तर चालूच आहे पण आज तिचा श्रृंगार आपण मांडीत आहोत. तिच्या कंठात मोत्याचा हार आहे. कपाळावर मळवट भरलेला आहे. कंठावर पदक आहेत व कासे पितांबर पिवळा आहे. जगदंबा, अष्टभुजा फार मनमोहक दिसत आहे.  तिचे मनोहर स्वरूप पाहून अंतरंगात, ‘जगदंब जगदंब’असा सहजच नामघोष होत आहे. आज संत एकनाथ महाराज यांचा जोगवा, त्याचाच महिमा गाणार आहोत, देवीच्या कृपेने आपल्याला ऐहिक वैभव लाभलेले आहे. अन्न आहे, मान आहे,अब्रूने जगता येईल एवढं धन आहे. मग आता आपण देवीकडे मागायचं काय तर?

 

नवविध भक्तीच्या करोनि नवरात्रा 

करोनि निराकरण मागेन ज्ञानपुत्रा

ज्ञान मागायचे. ज्ञान म्हणजे आत्मबीज मागावयाचे. भक्ती वैराग्य दे असं मागणं मागावयाचे पण याचा ताठा येता कामा नये. गर्व, अहंकार, मद, मत्सर, हे आपल्या आसपासही फिरकू नयेत.

दंभाला झ्थ सासरा मानला आहे. मी कोणीतरी फार मोठा आहे ही भावना नसावी, त्याच बरोबर ‘आत  एक व बाहेर एक’ दाखवण्याची व्रुत्ती असू नये. मीच खरा देवीचा भक्त, उपासक असा मनात किंतू किंचितही आणू नये. आपल्याला देवीचे भजन-पूजन-नैवेद्य आरती, फुलोरा, साजशृंगार या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत पण देवीने आपल्याला खरच प्रसन्न होऊन तिच्या अनादि, निर्गुण, निराकार अशा स्वरुपाच दर्शन आपल्या ठायी द्याव हे महत्वपूर्ण मागण मागाव.

पुन: एकदा ’रोडगा’ मागताना सर्वसामान्य भगिनीवर्गाला आपल्या रोजच्या नातेसंबंधाचे उदाहरण देऊन ते पटवून देतात. ते स्त्रीवर्गाला सहजच भावत,

“नणंदेच कारट किरकिर करत। खरुज होऊ दे त्याला ।”

“जाऊ माझी फाडफाड बोलते I बोडक  कर ग तिला ।”

नणंद, जाऊ, सासरा, सासू म्हणजे आपल्या जवळ चोवीस तास वास्तव्यास असणारे काम, क्रोध, मोह, मद व मत्सर हे आहेत. हे आपल्याला शेवटपर्यंत त्रास देतात. नव्हे छळतात. अशी सत्यता आहे.शेवटचा शत्रू आपलाच आपल्या ठायी असणारा म्हणजे ’अहंकार’ “दादला मारूनी आहुती देते मोकळी कर ग मला” दादला म्हणजे अहंकार, त्याला समूळ नष्ट कर व मला एकटीलाच ठेव. याचा अर्थ स्वरुपज्ञान, आत्मज्ञान,आत्मबोध दे.

मी वर्षानुवर्षे उपवास करत आहे तुझ्या दर्शनाला येत आहे खणा नारळाने तुझी ओटी भरत आहे आता तो मला सत्वर पाव प्रसन्न हो मी तुला वेणवते आहे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला या प्रार्थनेतून आई जगदंबा प्रसन्न होईल व आपल्याला देह-मन- बुद्धीवर आपण विजय मिळवून धन्य होणार आहे.

 

IIउदे  ग अंबे उदेII

 IIउदे ग अंबे उदेII

 

भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड, पुणे

84129 26269

Leave A Reply

Your email address will not be published.