नवाविध भक्ति व नवरात्र – प्रस्तावना

0

नवरात्री विशेष लेख 

श्रावण आला म्हणजे भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव साजरे व्हायला सुरुवात होते. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे. . हे सण उत्सव आपण अत्यंत आनंदाने साजरे करतो. येत्या 15 ऑक्टोबर रविवार रोजी घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होईल. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येईल. यानिमित्ताने पुण्यातील कोथरूडच्या भाग्यरेखा पाटोळे यांनी ‘नवाविध भक्ती व नवरात्र’ हे सदर वाचकांसाठी सुरू केले आहे. येत्या नवरात्रीत मंगलमय व पवित्र ज्ञानप्रकाशात या नऊ दिवसांचा जागर घडवण्याचा हा अल्पसा प्रयत्न…!

पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ कोण ? या प्रश्नाच उत्तर ‘आई’ असे येते, हे निर्विवाद सत्य आहे, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या विषयी कोणचेही दुमत नाही, जगाची ओळख ही जन्मदात्री  माताच घडविते तिचे ऋण कधीही फिटु शकत नाही. दुसरे ऋण हे मायभूमीचे, ’आपली भारतमाता’ तिच्या छत्राखाली  सुरक्षित वातावरणात आपण आपला धर्म  आचरण करू शकतो.  तिचे आपल्यावरचे पांग फिटु शकत नाही. तिसरे ऋण सद्गुरुंचे. ते आपली माता माऊलीच असतात. जन्म मरणाच्या फेऱ्यातून ते आपली सुटका करतात व हा भवसागर पार पाडण्यास मदत करतात. आपला धरलेेला  हात ते कधीही सोडत नाही.

सर्व जीवांचे भरण-पोषण होण्यासाठी आपल्याला अन्नधान्य पुरविते ती भूमाता  म्हणजे ‘काळीआई’. तिचे अनंत उपकार आहेत. ते कसे फेडणार तिथेही उपकृतच रहावे लागते. सर्व जगताचा सांभाळ करणांरी जगन्माता म्हणजे आपली ’कुलस्वामिनी आई’. तिला आपण ‘आई’ असेच संबोधतो. प्रत्येक जीवाचा असा भाव असतो, ‘आपण तिच्या कृपा छत्राखाली आहोत व तिची दृष्टी आपल्याकडे आहे’ या भावानिशी तिची उपासना अखंड चालु राहते.

कुलस्वामिनीला प्रसन्न ठेवण्यासाठी वर्षातुन एकदातरी आपण तिच्या दर्शनाला जातोच. मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी देवीचा वार म्हणुन उपवास करतो. मातेच्या दर्शनाला जाताना साडी-चोळी-खण-नारळ-पेढे अशी पूर्ण भावानिशी ओटी भरतो. तिला साष्टांग प्रणिपात  करतो. नाक घासुन पाया पडतो. आपल्या अपराधांची क्षमा मागतो. कान पकडुन माफी मागतो. अंर्तःमनात आपण ‘आईला ही गोष्ट आवडेल का?’ असा प्रश्न असल्याने वर्तन अधिक पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो.

प्रत्येक कुळाची कुलस्वामिनी ठरलेली असते. त्याचप्रमाणे कुळधर्म व कुळाचार ही, तसेच जास्तीत कसोशीने करण्याचा प्रयत्न भगिनी वर्गाकडुन अधिक होतो. कारण ती माता आहे व आपण तिचे लेकरु आहोत हा  वात्सल्य भाव असतो. ती मातेला ‘पदरात घे’ असे ही संबोधते. ’स्त्री’ मध्ये ’समर्पण’ भाव अधिक असतो. यामुळे सगळ्याचा  सांभाळ ती करते स्नेहीजन, नातेवाईक ती बघते. घरातील मंडळी अगदी पाळीव प्राणी, पक्षी यांचा सुद्धा. सख्य भावानं, वात्सल्य भावाने देवीशी जोडणे तिला सोपे जाते. ’उदे गं अंबे उदे, उदे गं अंबे उदे’ असा पुर्नउच्चार ती सहज करते. नवरात्रात हे भाव सारे ’उत्स्फुर्त ’ अर्विभूत होतात. देवीचे स्मरण वर्षभर जरी अखंड असले तरी नवरात्रात हा भाव ’विशेषत्वाने’ प्रकट होतो व भावभक्तीचा जणु कळसच गाठला जातो.

यावर्षी येणारा नवरात्र उत्सव अश्विन शु. प्रतिपदा पंधरा ऑक्टोबर पासुन सुरु होत आहे व चोवीस ऑक्टोबरला विजयादशमीला तो पुर्णपणे संपन्न होत आहे. या नऊ  दिवसात आपण नवाविध भक्तीद्वारा देवीचे पुजन करणार आहोत, समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या ’दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात जी नवविधा भक्ती प्रतिपादली आहे. तिचा अल्प परिचय करीत करीत एक एक दिवस श्रवण, मनन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन या पायऱ्या
चढणार आहोत. त्याच्या आधाराने उपासना करत देवीच्या महाद्वारात प्रवेश करणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा गोंधळ, संत एकनाथ महाराज यांचा ’जोगवा’ किंवा संत तुकाराम महाराज यांच्याही काही रचना या संदर्भात देवीची पुजा बांधताना त्याचा केवळ आढावा न घेता  अंतरंगात मुरवण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहोत .देशभर विविध प्रांतात, गावात, साजरा होणारा उत्सव अधिक मंगलमय व पवित्र करु या व ज्ञानाच्या प्रकाशात या नऊ दिवसात जागर घडवू या.

॥ उदे ग अंबे उदे II

  IIउदे ग अंबे उदे ॥

 

– भाग्यरेखा पाटोळे

 

कोथरूड, पुणे

84129 26269

 

Leave A Reply

Your email address will not be published.