नवाविध भक्ति व नवरात्र – आत्मनिवेदन

0

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख

 

समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथात नवाविधा भक्तीतील अतिशय महत्त्वाची भक्ती व स्थिती वर्णिली आहे ती म्हणजे ‘आत्मनिवेदन’. नवाविधभक्तीच्या यात्रेतून ज्ञानाचा उदय होतो. आत्मनिवेदन म्हणजे भक्तीतून जन्मलेले ज्ञान होय. अतिशय शुद्ध व पवित्र ज्ञान ज्याला अन्य कोणताही पर्याय नाही भक्त देवाशी एकरूप होतो. जसे जिथे आई तिथे मूल किंवा गाय तिथे वासरु असे नाते प्रस्थापित होते.

नवरात्री मध्ये आता नऊ दिवसाची उपासना सफळ व संपूर्ण होते. नऊ दिवसाचे पारणे साजरे होते. सप्तशतीचे पाठ झालेले असतात. होम-हवन सिद्धीस गेलेले असते. सहा रसांनी युक्त असे सुग्रास भोजन नैवेद्य म्हणून कुलस्वामिनीला अर्पण केलेला असतो. सवाष्ण, आचार्य, ब्राह्मण, पुराणिक हे अतिथी म्हणून देवासमान मानून त्यांना भोजन दिले जाते. एक समाधान, शांती तृप्ती व आनंदाने मंगलमय व पावित्र वातावरणात पारण पार पडत असते. निज दासाची भक्ति पाहुन कुलस्वामिनी प्रसन्न झालेली असते. केवढे दुःखापासून नाही केवळ क्लेशापासून नाही तर भवपाश पार करण्यास ती सहाय्यभूत होणार आहे. भक्ती भावात तल्लीन झालेले उपासक *”या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता”* असे तिचे गुणगाण करीत आहेत.

सुखाचं वदन जिचे आहे, मृगासारखे नयन आहेत, गजगमन करीत आहे, भयाच हरण करणारी आहे. शिवाच्या भजनात ती रत आहे. शशि हेच जिचे सदन आहे अशी ही अंबामाता सर्वांसाठीच कल्याणप्रद मोक्षप्रद ठरलेली आहे.

या नऊ रात्रीत आपण जी उत्कट व भावपूर्ण भक्ती अनुभवली जिची प्रचिती घेतली त्याची परिणीती कशी होणार आहे. तर संत एकनाथ महाराज आपल्या जोगव्यात त्याच सुंदर स्पष्टीकरण मांडतात,
“ऐसा जोगवा मागुनि देविला । ”
“जावोनि महाद्वारी नवस मी फेडिला । ”
“एकपणे जनार्दन देखिला । ”
“जन्म मरणाचा फेरा चुकविला ॥ ”
अंतिम बोध उपासकाला व्हायला हवा हे आत्मनिवेदन आहे. उपासक पूर्ण शांत, पूर्ण तृप्त समाधानी व आनंदी झाला आहे. जीवाची शक्ती अल्प होती. कुलस्वामिनी कृपेने व प्रसन्नतेने ती व्यापक झाली आहे. तिने ऐहिक व पारत्रिक दोन्हीही समृद्धी बहाल केल्या आहेत. पण ही कृपा आता कायमस्वरूपी हवी यासाठी ज्ञानराज माऊली गोंधळात म्हणतात,
“करी कृपा, करी कृपा, करी कृपा”
पूर्ण उच्चार करतात, त्याही पुढे जाऊन मागणं मागताना “सर्व सूख देई, सर्व सुख देई” आपले पद, बंगला, गाडी, जावई, सुना, प्रतिष्ठा, पैसा हे सुखदुःख मिश्रित आहेत. पूर्ण सुखाची कल्पना फक्त भगवंताच्या चरणाशीच येऊन थांबते म्हणून तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते आज नवमी पर्यंत श्री देवीच्या चरणाशीच आपण मागणं मागत होतो,
“सर्व मांगल्ये मांगल्ये शिवेसवार्थ साधिके ।”
“शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमः स्तुते।।”
निज भक्तावर करुणा केल्याने आनंद दाही दिशाला व्यापून राहिला आहे. एक अवर्णनीय अशा मोठ्या उत्सवाची सांगता आज होत आहे. पण भक्तीचा महिमा जो आपण अनुभवला तो आपल्या पाशीच राहणार आहे. म्हणूनच उद्घोष अंर्तमनात घुमतच आहे.

॥ उदे ग अंबे उदे II
IIउदे ग अंबे उदे II

 

भाग्यरेखा पाटोळे

पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.