जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेला आज पासून येथे प्रारंभ होत असून या स्पर्धेत जळगाव केंद्रावर १४ नाटके सादरकरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित राज्य नाटय स्पर्धा ही हौशी रंगकर्मीसाठी मोठी पर्वणी असते. यानाट्य स्पर्धातून अनेक लेखक, कलावंत मराठी रंगभूमीला मिळले आहेत. आज देखील एक मोठी संधी म्हणून उदयोन्मुख कलावंत या स्पर्धेकडे पहात असतात. जळगाव केंद्रांवर सादर होत असलेल्या नाटकांमुळे या केंद्राने आपला एक विशिष्ट दर्जा राखला आहे.
त्यामुळे रसिकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळत असतो. या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नाटयगहात ही स्पर्धा होत असून त्यात १४ नाटके दररोज सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहेत. दि. २४ रोजी सायंकाळी ६वाजता अविरत इंदूर या संस्थेने सादर केलेल्या प्रा. दिलीप परदेशी लिखित थेंब थेंब आभाळ या नाटकाने या नाटयस्पर्धेचे उदघाटन होत असून या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार उन्मेष पाटील , खासदार रक्षाताई खडसे, आमदार राजूमामा भोळे माजी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलिस अधिक्षक एस . राजकुमार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती नाटयस्पर्धेचे समनवयक संदीप तायडे यांनी दिली असून नाटय रसिकांनी या नाटकांना मोठयाप्रमाणावर उपस्थिती देण्याचे आवाहन केले आहे.